Dharashiv: गणेश जाधव, धाराशिव: धाराशिव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना शिवसेनेकडून (ठाकरे गट) उमेदवारी जाहीर झाली आहे. पण अद्यापही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. महायुतीमध्ये धाराशिव मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे येथे ठाकरेंच्या उमेदवाराला चीतपट करण्यासाठी अजित पवार हे वेगळाच डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. (lok sabha election 2024 ajit pawar to make new move to defeat uddhav thackeray shiv sena candidate omraj nimbalkar archana ranajagjitsinha patil likely to contest on ncp ticket in dharashiv)
ADVERTISEMENT
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करु शकतात. एवढंच नव्हे तर त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार देखील असण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत अनेक नावं ही चर्चेत येत होती. मात्र, आता राणाजगजीतसिंह यांच्या पत्नीलाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा अजित पवारांचा नवा डाव असल्याची चर्चा धाराशिवमध्ये सुरू आहे.
यामुळे लोकसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना पुन्हा एकदा रंगू शकतो. पक्षवाढीसाठी एखादा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करेल व त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. असे सूचक विधान राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडून केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे परभणी येथे महादेव जानकर यांची उमेदवारी अर्ज भरण्यास गेले होते. त्यामुळे उद्यापर्यंत अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश होऊन थेट उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> शिवसेनेने नाशिकची जागा गमावली?, गोडसेंचं करिअर पणाला..
धाराशिवच्या लोकसभेच्या इतिहासात 1991 साली विमल मुंदडा, 2004 साली माजी खासदार कल्पना नरहिरे नंतर तिसऱ्यांदा 2024 मध्ये अर्चना पाटील यांच्या रूपाने महिला उमेदवाराला संधी मिळू शकतो. कल्पना नरहिरे यांचा 1,649 मतांनी विजय झाला होता तर मुंदडा ह्या 83,055 मतांनी पराभूत झाल्या होत्या. शिक्षक आमदार तथा विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचे नावही सध्या आघाडीवर आहे. मात्र त्यांची 4 वर्षांची टर्म शिल्लक असल्याने पक्षात त्यांच्या नावाविषयी बराच खल झाला. मात्र, आता अर्चना पाटील यांच्या नावावर अजित पवारांकडून शिक्कामोर्तब झालं असल्याचं समजतं आहे.
कोण आहेत अर्चना पाटील?
अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत. अर्चना पाटील या इंजिनीअर असून उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. जनसामान्यांना सहज उपलब्धता, लोकांचे प्रश्न व्यवस्थित व लवकर सोडवणे या जमेच्या बाजू आहेत. याशिवाय लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या त्या अध्यक्षा असून धाराशिव जिल्ह्यात मोठे महिला संघटनही त्यांनी उभे केले आहे.
अर्चना पाटील यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणारी पोस्ट
ओमराजे निंबाळकर उमेदवार की गुन्हेगार अश्या आशयाचे व्हाटसअप स्टेट्स ठेवत अर्चना पाटील यांनी टीका केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा नराधम आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्याचा दाखला देत पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये खासदार ओमराजे यांचा नराधम असा उल्लेख करीत त्यांनी ओमराजे यांना डिवचले होते.
हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024 : "ठाकरे-पवारांना याची उत्तरे द्यावी लागतील"
डॉ. पद्मसिंह पाटील व पवनराजे निंबाळकर या दोन परिवाराचा निवडणुकीतील राजकीय विरोधाचा इतिहास तसा जुनाच व सर्वश्रुत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार ठरण्यापूर्वीच पाटील-निंबाळकर या दोघांतील वाद वाढणार असल्याचे दिसते आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ओमराजे यांच्यावर पोस्ट करुन टीका केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
ADVERTISEMENT