Kashmir Pahalgam Terror Attack: सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, महाराष्ट्रातील किती जणांनी गमावले प्राण? एकूण 27 पर्यटक ठार

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा देखील समावेश आहे.

 महाराष्ट्रातील किती जणांनी गमावले प्राण?

महाराष्ट्रातील किती जणांनी गमावले प्राण?

मुंबई तक

22 Apr 2025 (अपडेटेड: 22 Apr 2025, 09:02 PM)

follow google news

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन येथे अत्यंत भयंकर असा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले. ज्यामध्ये तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. या हल्ल्यात डझनभराहून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यात केवळ लोकंच नाही तर काही घोडेही जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच सीआरपीएफच्या अतिरिक्त क्विक रिअॅक्शन टीम्स (QAT) घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

हे वाचलं का?

खरंतर, काश्मीरमध्ये असे काही भाग आहेत जिथे दहशतवादी दिसत नाही, पहलगाम हा असाच एक भाग आहे. त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर, येथे देशभरातून शेकडो पर्यटक येथे सतत येत असतात. पहलगाममधील एका पर्वताच्या माथ्यावर पर्यटक ट्रेकिंगसाठी जातात. हा दहशतवादी हल्ला तिथेच झाला आहे. तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.

हे ही वाचा>> भयंकर... काश्मीरमध्ये पर्यटकांवर झाडल्या गोळ्या, महाराष्ट्रातील जखमी पर्यटकांची यादी आली समोर!

या हल्ल्याची जबाबदारी काश्मीरमध्ये दहशतीचे नवे प्रतिशब्द बनलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली आहे.

महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जणांचाही मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

हे ही वाचा>> जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर भ्याड दहशतवादी हल्ला,10 जणांचा मृत्यू!

दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधानांनी लिहिले की, 'ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. या भयानक हल्ल्यामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा होईल; त्यांना सोडले जाणार नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईची आमची वचनबद्धता अढळ आहे आणि ती आणखी मजबूत होईल.'

दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार अॅक्शनमध्ये आलं आहे. पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी या घटनेवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. अमित शहा म्हणाले की, या भयानक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि आम्ही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू आणि त्यांना कठोर शिक्षा देऊ. गृहमंत्री अमित शहा लवकरच श्रीनगरला पोहोचतील. येथे गृहमंत्री सर्व एजन्सींसोबत सुरक्षा आढावा बैठक घेतील.

प्रशासनाने मदतीसाठी सुरू केला हेल्पडेस्क 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पर्यटकांना मदत करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने पोलीस नियंत्रण कक्षात एक मदत कक्ष सुरू केला आहे. हे 24 तास उपलब्ध राहील. जिल्हा एसएसपी अनंतनाग यांच्या मते, हेल्पडेस्कचे दूरध्वनी क्रमांक आहेत- 9596777669, 01932225870. याशिवाय एक व्हाट्सअॅप क्रमांक आहे: 9419051940. पर्यटक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात आणि आवश्यक माहिती मिळवू शकतात.

पहलगाममधील दहशतवादी हल्ला ही चिंताजनक बातमी आहे. अमरनाथ यात्रा देखील काही महिन्यातच सुरू होणार आहे आणि बेस कॅम्प पहलगाममध्येच आहे. अशावेळी झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

    follow whatsapp