Sanjay Raut Sangli: सांगली: 'महाविकास आघाडीने समन्वयातून जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ पातळीवरून चर्चा करूनच सांगलीची जागा जाहीर करण्यात आली आहे. मात्र तरी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करणे म्हणजे राजकीय परिपक्वता नसणे असेच म्हणावे लागेल.' अशा शब्दात शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारलं आहे. सांगलीमध्ये खासदार संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'भाजपाच्या विषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट आहे, चारशे पारचा दावा म्हणजे भंपक आणि फसवा आहे, कोणत्याही परिस्थितीत पुन्हा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होणार नाहीत.' असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> "सुनील तटकरेंचं 'ते' प्रकरण उद्धव ठाकरेंपर्यंत जात होतं", सोमय्यांचा मोठा स्फोट
ते पुढे म्हणाले, 'आघाडीमध्ये जागावाटप करणे कठीण काम असतं. मात्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी समन्वयातून जागावाटप केलं आहे. एखादा जागेसाठी दोन्ही पक्षाचा दावा असू शकतो. मात्र दोनच दिवसात वातावरण बदललेलं असेल. सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनाच लढेल आणि ती जिंकेल. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. आत्ता जरी त्यांची सांगलीच्या उमेदवारीबाबत आग्रहाची भूमिका घेतली असली तरी दोन दिवसात पूर्णपणे चित्र बदललेलं असेल.' असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
सिल्व्हर ओकवर काय घडलेलं?
दरम्यान, 3 एप्रिलला सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या जागांवर पेच निर्माण झाला आहे, त्यावर चर्चा करताना मविआतील नेत्यांमध्ये खडाजंगी झालेली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडायला काँग्रेस तयार नाही. त्यानंतर बैठकीत काँग्रेस नेत्यांचा आवाज चांगलाच वाढलेला.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांनी सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एक जागा सोडायला नकार दिला. दुसरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सांगली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भिवंडी या जागांवरील दावा सोडायला तयार नव्हते.
हे ही वाचा>> 'मविआ'त सांगलीचा वाद चिघळला! राऊत म्हणाले, "आम्ही निर्णय घेतलाय"
बैठकीत तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान खडाजंगी झाली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे बैठकीतून निघून गेले. दिल्लीतील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे सांगत पटोले आणि थोरात हे बैठक सोडून निघून गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, असं असताना काल (4 एप्रिल) शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीड आणि भिवंडी मतदारसंघातील उमेदवार हे जाहीर करण्यात आले. असं असलं तरीही सांगलीच्या जागेबाबतचा वाद हा अद्यापही कायम आहे. कारण विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे आज पुन्हा एकदा दिल्लीला हायकमांडच्या भेटीसाठी गेले होते.
ADVERTISEMENT