Ambadas Danve: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज असल्याची आणि ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, या सगळ्या केवळ अफवा असल्याचं अंबादास दानवेंनी आज (30 मार्च) पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांना जेव्हा अशी विचारणा करण्यात आली की, आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावर दानवेंनी अगदी स्पष्ट उत्तर देत हा विषय संपवला आहे.
'मी नाराज असलो म्हणून काय झालं.. मी स्पष्टपणे सांगितलं ज्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर करतात तोपर्यंत नाराजी असते. रोजरोज थोडी नाराजी असते. नाराज असलं म्हणजे पक्ष सोडतात का?' असा सवालच दानवेंनी यावेळी विचारला.
'खैरे आमचे नेते, जिल्ह्याचे पालक...'
दरम्यान, यावेळी दानवेंना खैरेंविषयीही देखील विचारणा करण्यात आली त्यावर दानवे म्हणाले की, 'मी 30 वर्ष जुना शिवसैनिक आहे.. बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा शिवसैनिक आहे. पदं येत असतात, पदं जात असतात. मी गटप्रमुखापासून ते विरोधी पक्ष नेते पदापर्यंत जबाबदारी पार पाडणारा नेता आहे.'
'चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं मी तिकीट मागितलं होतं. एवढाच विषय आहे. तिकीट जर 2-3 लोकांनी मागितलं म्हणजे मतभेद आहेत असं नाही. खैरे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत. संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहेत. आम्हा सगळ्या तरूण कार्यकर्त्यांना संभाळण्याचं काम त्यांनी केलं आहे. आजही आम्ही त्यांच्याच नेतृत्वात संभाजीनगरात काम करतो.'
'उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही प्रचार करणार. आम्ही शिवसेना काय भीक मागणारे आहोत का? शिवसेना लढणारी आहे.. लढेल आणि जिंकेन..' असं विधान दानवेंनी केलं.
'मला कोणतीही ऑफर नाही..' पक्षप्रवेशाच्या चर्चांना दानवेंकडून पूर्णविराम
'मला कोणतीही ऑफर नाही. मला ऑफर येण्याचा प्रश्न नाही.. महायुतीला उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आम्हाला संभाजीनगरमध्ये भिडण्याची ताकद नाही.'
'उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झाले. मला वाटतं नाराजी वैगरे त्याच दिवशी संपली. पक्षप्रमुखांकडे मी जाऊन आलो. तेवढ्या दिवसापुरता विषय होता. पण शिस्त पाळणं हा देखील विषय असतो. विषय संपलेला आहे.. शिवसेनेला 100 टक्के यश मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.' असा दावाच दानवेंनी यावेळी केला
ADVERTISEMENT