Maharashtra Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील प्रचारसभेत केलेल्या विधानावर शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. हे मुर्खपणाचे विधान आहे, असे म्हणत पवारांनी मोदींना सुनावले आहे. त्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून, लक्ष विचलित करण्यासाठी धर्म, जातीचे मुद्दे काढले जात आहेत, असेही ते म्हणाले. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sharad Pawar has expressed his anger on Modi's statement about muslims)
ADVERTISEMENT
नाशिक येथे झालेल्या प्रचारसभेत मोदी म्हणालेले की, "देशाच्या अर्थसंकल्पातील १५ टक्के वाटा फक्त अल्पसंख्याकांवर खर्च करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. तुमच्या संपत्तीपाठोपाठ धर्माच्या आधारावर अर्थसंकल्पाचाही १५ टक्के वाटा अल्पसंख्यांकांना देण्याचा घाट काँग्रेसने घातला आहे."
मोदींच्या याच विधानाबद्दल शरद पवारांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींच्या विधानावर पवार काय बोलले?
या विधानावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "हे बोलणं योग्य नाही, पण मुर्खपणाचे स्टेटमेंट आहे. बजेट (अर्थसंकल्प) हे कुठल्या जातीचे, धर्माचे असत नाही. संसदेत जे बजेट मांडलं जातं, ते देशाचे बजेट असते. असं असताना ते जे सांगताहेत की, मुस्लिमांचं वेगळं, मुस्लिमांचं वेगळं... हे कधीही होत नाही. होऊ शकत नाही."
हेही वाचा >> अजित पवार महायुतीच्या प्रचारातून गायब, गेले कुठे?
व्होट जिहाद हा काँग्रेसचा डाव आहे, असे म्हणत मोदींनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, "त्यांच्यासमोर दुसरं सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे या विषयाकडे ते लक्ष विचलित करत आहेत. ते जे बोलताहेत सध्या, त्यात एक टक्का सुद्धा खरं नाही. आपण जेव्हा देश चालवायचा असेल, तर जाती धर्माचा विचार करून देश चालवता येईल."
हेही वाचा >> 'नवरदेव बनवून किती दिवस बोहल्यावर चढणार...', ठाकरेंनी PM मोदींना डिवचलं
मोदींच्या या विधानाकडे कसं पाहता, असा प्रश्न जेव्हा पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "सरळ गोष्ट आहे की, त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. मग लक्ष विचलित कुठे करायचं, तर धर्म, जात या नावाने सुरू केले."
पृथ्वीराज चव्हाण यांच्या अंदाजाबद्दल पवारांचं भाष्य
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या तीन-चार जागा निवडून येतील, असे भाकित पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, "ती पृथ्वीराज चव्हाणांची असेसमेंट असेल. ट्रेंड आम्हाला अनुकूल दिसतोय. मी असं नाही म्हणणार की, शंभर टक्के असंच होईल. पण, जनमत ठिकठिकाणी बदलाला अनुकूल आहे आणि भाजप, तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवण्यासाठी लोक अनुकूल आहेत."
मोदींच्या रोड शो वर पवार म्हणाले...
"मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. लोकांना तासन् तास थांबावं लागतं. ट्रॅफिक भयंकर होतं. त्यांनी कार्यक्रम ज्या भागात घेतला, तो गुजराती भाग आहे. मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्यांचं लक्ष एका वर्गाकडे होतं. त्याचा लोकांना त्रास झाला. लोकांच्या तक्रारी आल्या", असे मत पवारांनी मांडले.
ADVERTISEMENT