Lok Sabha elections 2024 : शिवसेना खासदाराचं तिकीट कापलं; शिंदे 'इथेही' उमेदवार बदलणार?

मुंबई तक

• 04:02 PM • 27 Mar 2024

Shiv Sena Krupal Tumane Latest News : एकनाथ शिंदे यांनी कृपाल तुमाने यांचे तिकीट कापत राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता आणखी खासदारांची तिकिटे कापली जाणार असल्याची शक्यता आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी राजू पारवे यांना उमेदवारी दिली.

राजू पारवे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंनी बदलला उमेदवार

point

तीन ते चार लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांना डच्चू मिळणार

point

भाजपकडून उमेदवार बदलण्याची सूचना

Shiv Sena Lok Sabha list : गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात दबक्या आवाजात एक चर्चा होती, ती आता खरी ठरताना दिसत आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना काही मतदारसंघातील उमेदवार बदलण्यास सांगितले आहे. यातील पहिली विकेट पडली आहे. एकनाथ शिंदेंनी विद्ममान खासदाराचं तिकीट कापत काँग्रेसमधून आयात नेत्याला उमेदवारी दिली आहे. तिकीट कापण्यात आलेल्या विद्ममान खासदाराचे नाव आहे कृपाल तुमाने. (shiv sena led by eknath shinde announced raju parve as lok sabha candidate instead of krupal tumane from ramtek)

हे वाचलं का?

महायुतीतील जागावाटपाच्या बैठका सुरू झाल्यानंतर सुत्रांनी अशी माहिती दिलेली की, शिवसेनेच्या काही मतदारसंघात खासदारांच्या विरोधी वातावरण आहे. पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमधून ही बाब समोर आली होती. त्यामुळे भाजपकडून एकनाथ शिंदेंना अशा मतदारसंघातील उमेदवार बदलण्यास सांगण्यात आले होते. यातील एक मतदारसंघ होता रामटेक, जिथे शिंदेंनी विद्ममान खासदार कृपाल तुमानेंना बाजूला काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्याला उमदेवारी दिली. 

राजू पारवेंच्या नावाची घोषणा, उमेदवारी अर्जही दाखल

कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले जाणार, हे खात्रीने सांगितले जात होते. त्यावर शिंदेंनी शिक्कामोर्तब केले. कृपाल तुमाने यांचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा होऊ नये म्हणून शिवसेनेकडून त्यांच्या नाव जाहीर न करता थेट उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्याला एकनाथ शिंदे आणि महायुतीचे इतर उमेदवार उपस्थित होते.

हेही वाचा >> जरांगेंसोबत आंबेडकरांचा काय ठरला प्लॅन ; 'मविआ'चा होणार गेम?  

याबद्दल शिंदे म्हणाले, "रामटेकचे आमचे राजू पारवे हे देखील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या भूमीतून उभे आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की काँग्रेसमध्ये काही राम राहिलेला नाही. विद्यमान आमदार असताना त्यांनी महायुतीची उमेदवारी घेतलेली आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या पाठिंशी आमचे खासदार कृपाल तुमाने हे भक्कमपणे उभे आहेत. तुमाने यांनाही मी मोठी जबाबदारी देणार आहे. तुमाने यांच्या दहा वर्षातील कामाची पोचपावती या निवडणुकीत मिळेल", असे एकनाथ शिंदे राजू पारवे यांची उमेदवारी जाहीर करताना म्हणाले. 

शिंदेंच्या आणखी खासदारांची उमेदवारी धोक्यात

जी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे, त्यानुसार भाजपने अंतर्गत सर्व्हे केले. यात शिवसेनेच्या काही मतदारसंघात खासदारांबद्दल चांगली परिस्थिती नसल्याचे आढळून आले. राजकीय वर्तुळात ज्या खासदारांच्या नावांची चर्चा आहे, त्यात खालील नावांचा समावेश आहे. 

नाशिक लोकसभा मतदारसंघ - हेमंत गोडसे 
यवतमाळ-वाशिम लोकसभा - भावना गवळी
हिंगोली लोकसभा - हेमंत पाटील
मुंबई उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर
कोल्हापूर - संजय मंडलिक

लोकसभा हेमंत गोडसेंच्या मतदारसंघात काय?

हेमंत गोडसे यांचेही तिकीट कापले जाणार याची शक्यता आहे. त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या गोडसे यांनी समर्थकांसह मुंबई गाठत शिंदेंच्या घराबाहेर शक्तिप्रदर्शन केले होते. दुसरीकडे भाजपकडून हे सांगितलं जात आहे की, गोडसेंच्या विरोधात वातावरण असल्याने भाजपने येथून उमेदवार द्यावा. पण, सगळ्यात आता छगन भुजबळ यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

भावना गवळींचीही उमेदवारी धोक्यात?

खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीवरही टांगती तलवार आहे. त्यामुळे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांच्यासोबत काही खासदारांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यात भावना गवळी यांचाही समावेश होता. गवळी यांच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी काही नेत्यांनाही यवतमाळ-वाशिमला पाठवले होते. त्यामुळे भावना गवळी यांच्याऐवजी संजय राठोड किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळेल असे सांगितले जात आहे. 

पाटील, कीर्तिकर, मंडलिक

हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे तिकीट कापले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना हेमंत पाटील म्हणालेले की, मला राज्यपाल बनवतील. त्यामुळे पाटलांच्या मनातही उमेदवारीबद्दल चलबिचल आहे, असेच दिसून आले. या जागेवरून भाजप उमेदवार देऊ शकतो, अशी चर्चा आहे. पण, अंतिम निर्णय पुढील काही दिवसांत होऊ शकतो.

हेही वाचा >> 'महाविकास आघाडी'च्या डीलमध्ये ठाकरेंना फायदा की फटका? 

दुसरीकडे गजानन कीर्तिकर यांच्या ऐवजी संजय निरुपम यांना पक्षात घेऊन शिंदेंच्या सेनेकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. ही जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे समजते, पण उमेदवार बदलून दिला जाणार असल्याने निरुपम या जागेवरून निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात. कोल्हापूरमध्येही संजय मंडलिक यांच्याविरोधात वातावरण असून, त्यांनाही बदलले जाऊ शकते.

    follow whatsapp