MNA Vasant More Pune: पुणे: मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी एक फेसबुक पोस्ट देखील वसंत मोरेंनी शेअर केली आहे. ज्यामध्ये ते राज ठाकरे यांच्या फोटोसमोर साष्टांग दडवंत घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच त्यांनी आपला राजीनामा देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने पुणे मनसेला मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
रात्री नाराजीची पोस्ट, दुपारी थेट अखेरचा जय महाराष्ट्र...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि भोग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर त्याला सर्वात आधी विरोध करणारे पुण्यातील तीन वेळचे मनसे नगरसेवक वसंत मोरे हेच होते. तेव्हापासूनच ते पक्षातील एका गटाच्या टार्गेटवर आले होते.
त्यानंतर काही दिवसातच राज ठाकरेंनी त्यांना पुण्याचा शहराध्यक्ष पदावरून हटवत त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नेमणूक केली होती. ही बाब वसंत मोरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. मात्र, त्यानंतरही वसंत मोरेंनी मनसे सोडली नव्हती.
मात्र, लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या वसंत मोरेंना पक्षाकडून कोणत्याही पद्धतीचा ग्रीन सिग्नल मिळत नसल्यानेच आता त्यांनी मनसे सोडली असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, काल (11 मार्च) रात्रीच्या सुमारास एक नाराजी व्यक्त करणारी फेसबुक पोस्ट वसंत मोरे यांनी शेअर केली होती.
त्या पोस्टमध्ये असं म्हणण्यात आलं होतं की, 'एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो.. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो.
त्यांच्या या पोस्टला अवघे काही तास होत नाही तोच आज (12 मार्च) दुपारी त्यांनी मनसे पक्ष सोडल्याची पोस्ट शेअर केली.
ADVERTISEMENT