Dharmaveer-2 सिनेमाची संपूर्ण कहाणी, शिंदे-ठाकरेंमध्ये तेव्हा नेमकं काय घडलेलं?

अजय परचुरे

27 Sep 2024 (अपडेटेड: 27 Sep 2024, 04:22 PM)

Dharmaveer-2 Movie: धर्मवीर-2 हा सिनेमा आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय घडलं हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Dharamveer-2 सिनेमाची संपूर्ण कहाणी

Dharamveer-2 सिनेमाची संपूर्ण कहाणी

follow google news

बातम्या हायलाइट

point

धर्मवीर-2 सिनेमा आजपासून महाराष्ट्रात प्रदर्शित

point

सिनेमात पाहायला मिळणार ठाकरे आणि शिंदेंमधील व्दंद्व

point

विधानसभा निवडणुकीआधी धर्मवीर 2 रिलीज

Dharmaveer-2 and Eknath Shinde: मुंबई: अभिनेता प्रसाद ओकची धर्मवीर आनंद दिघेंच्या वेशातील ती ग्रँड एंट्री, प्रसाद ओकना आनंद दिघेंच्या वेशात पाहून स्टेजवर असलेले एकनाथ शिंदे हे स्तब्ध झाले होते. प्रसाद ओक स्टेजवर येताच साक्षात आनंद दिघेच आले असं मानून एकनाथ शिंदेंनी प्रसाद ओकला वाकून नमस्कार केला होता. ही सर्व दृश्ये आपल्या डोळ्यासमोर येतात आणि हे आठवण्याचं कारण म्हणजे 13 मे 2022 रोजी 'गद्दारांना क्षमा नाही...' अशी टॅगलाईन असलेला धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा रिलीज झाला होता. आता याच सिनेमाचा सिक्वेल 'धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हा सिनेमा आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे. (complete story of dharmaveer 2 cinema what happened then between eknath shinde and uddhav thackeray)

हे वाचलं का?

नेमका हा सिनेमा आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीच का रिलीज करण्यात येतोय. याचाच आढावा आपण आता घेणार आहोत.

धर्मवीर-2 सिनेमात नेमकं काय?

धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मे 2022 ला रिलीज झालेला. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. 2 वर्षापूर्वी धर्मवीर सिनेमा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाला पाठबळ देणारे आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणारे एकनाथ शिंदे हे तेव्हाच्या तत्कालीन ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते.

हे ही वाचा>> Sanjay Raut : "मिंधे सेनेच्या लोकांना लेडीज बार...", आनंद आश्रमात पैसे उधळले, संजय राऊत संतापले

या सिनेमाचं भव्य ट्रेलर लाँचही उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. सलमान खान, रितेश देशमुखही यावेळी उपस्थित होते. शिंदेंसोबत बंड करून गेलेले डझनभर मंत्रीही तेव्हा स्टेजवर उपस्थित होते. 'गद्दारांना क्षमा नाही...' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमात आनंद दिघेंच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. 

आनंद दिघेंचं हिंदुत्व, ठाणे जिल्ह्यात त्यांनी वाढवलेली शिवसेना याचा त्यात समावेश होता. मात्र, त्याचवेळी सिनेमात एकनाथ शिंदेंची इमेज बिल्डिंग करणारे प्रसंगही ठासून होते. एकनाथ कुठे आहे? हा डायलॉगही तेव्हा फेमस झाला होता. या सिनेमाच्या शेवटी आनंद दिघेंच्या मृत्यूसमयीच्या प्रसंगावरूनही बरंच राजकारण गाजलं होतं. 

या सिनेमाच्या प्रिमियरला उद्धव ठाकरे जातीने उपस्थित होते. मात्र आनंद दिघेंच्या मृत्यूसमयीचा चित्रीत केलेला प्रसंग न बघताच उद्धव ठाकरे प्रिमियर सोडून निघाले होते. माध्यमांना दिलेल्या बाईटमध्ये 'मी दिघेंचा मृत्यचा प्रसंग पाहू शकणार नाही. मी भावूक होईन..' असं सांगून उद्धव ठाकरेंनी तो प्रसंग तेव्हा पाहिला नव्हता. या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी या सिनेमाला सिनेमागृहात हाऊसफुल्ल गर्दी करत उचलून धरले होते.

हे ही वाचा>> India Today Conclave : 'मुंबई'च्या 'तुंबई'वरून ठाकरेंनी CM शिंदेंना घेरलं, ''थिएटर नाही जाऊन पिक्चर बघायला...''

त्यानंतर 12 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक झाली. आणि विधानभवनात या निवडणुकीचा निकाल लागत असतानाच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना घेऊन थेट सुरतेकडे प्रयाण केलं होतं. शिवसेना पक्षात मोठं बंड झालं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि महाराष्ट्रात सत्तापालट होऊन भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेतील आमदारांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती. 

एकनाथ शिंदे बंड करून मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. हे सत्तानाट्य घडत असतानाच दुसरीकडे न्यायालयात शिवसेना पक्ष कोणाचा यावरून जोरदार खडाजंगी सुरू होती. अखेर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना हा मूळ पक्षही गेला आणि धनुष्यबाण हे चिन्हही गेलं. एकनाथ शिंदेंकडे मूळ शिवसेनेची सूत्रही गेली. 2022 पासून राज्यात एकनाथ शिंदेंचं सरकार काम करू लागलं आणि यातच 30 जून 2024 ला एकनाथ शिंदेंनी 'वर्षा' या त्यांच्या निवासस्थानवर धर्मवीर 2 सिनेमाची घोषणा करत पोस्टर लॉंच केलं. 

आधी सिनेमा 9 ऑगस्ट 2024 ला रिलीज होईल अशी घोषणा करण्यात आली. जुलै 2024 ला राज्यात जोरदार पावसाचं आगमन झालं. पुणे शहर पूर्ण पाण्याखाली गेलं. अशा परिस्थिीत राज्य असताना सिनेमा कसा काय रिलीज करणार? म्हणून या सिनेमाची रिलीज डेट 27 सप्टेंबर 2024 करण्यात आली. 

आगामी विधानसभा तोंडावर असतानाच सिनेमा 27 सप्टेंबरला प्रदर्शित करण्यावरूनही जोरदार चर्चा झाली. पहिल्या भागात आनंद दिघेंची कहाणी सांगतानाच एकनाथ शिंदे कसे सच्चे आणि कडवट शिवसैनिक आहेत अशी इमेज बिल्डिंग काही प्रसंगातून करण्यात आली होती. निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील तेव्हा धर्मवीर 2 रिलीज होऊन या सिनेमातील प्रसंगावरून महाराष्ट्रात त्याची चर्चा होईल आणि त्यावरूनही शिवसेनेचा आणि पर्यायाने एकनाथ शिंदेंच्या इमेजला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाईल असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. 

सिनेमाचा प्रिमीयर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला. निमंत्रितांपैकी काही जणांशी मुंबई Tak ने संवाद साधला असता धर्मवीर 2 मध्ये नेमकं काय होतं याच्या काही गोष्टी स्पष्ट झाल्या, जसे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर, महाराष्ट्रात घडलेलं पालघर साधू हत्याकांड, ट्रीपल तलाकचा निर्णय, कोरोना काळात आँक्सिजन सिलेंडर वरून घडलेला भ्रष्टाचार आणि हे सगळं महाराष्ट्रात घडत असताना एकनाथ शिंदे सरकारमध्ये, पक्षात व्यथित होते याचं चित्रण करण्यात आलं आहे. 

'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंबरोबर मंत्री,आमदार, सामान्य शिवसैनिकांची होऊ न शकणारी भेट, व्यथित आमदार, मंत्री, शिवसैनिक या सर्व घटना एकनाथ शिंदेंना कथन करण्याचे प्रसंग यात मांडण्यात आले आहेत. पर्यायाने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून हिंदुत्वापासून फारकत घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंना होणारा त्रास, व्यथा आणि त्यामुळेच त्यांनी बंड करत शिवसेना सोडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच धर्मवीर 2 ची कथा असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी टॅगलाईन असलेला धर्मवीर 2 महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे.

    follow whatsapp