Actor Kiran Mane Post On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला अभिनेते किरण माने यांनी पाठिंबा दिला आहे. या निमित्ताने किरण मानेंनी पोस्टमधून भूमिका मांडली असून, त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतेय.
ADVERTISEMENT
अभिनेते किरण माने सामाजिक मुद्द्यांवर भूमिका मांडत असतात. मराठा आरक्षण आणि आंदोलनाबद्दल त्यांनी काही पोस्ट केल्या आहेत. यात त्यांनी जरांगे पाटलांचं कौतुक केलं आहे. तर मराठा आंदोलनावर टीका करणाऱ्यांना तिखट भाषेत सुनावलं आहे.
Maratha Protest : मराठा आंदोलनावर टीका करणाऱ्यांना काय म्हणाले किरण माने?
किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, “विरोधात साधी पोस्ट केली तरी अकाऊंट रिस्ट्रीक्ट होतं. जाब विचारणार्या पत्रकारांच्या नोकर्या जातात. कलाकारांना बायकॉट केलं जातं. अशा दडपशाहीच्या काळात, संविधानिक मार्गाने एक आंदोलन होतंय आणि त्याने सत्ताधार्यांना हलवून सोडलंय… हे खूप आशादायी आहे, एवढं जरी तुम्हाला कळत नसेल. तुम्ही मराठा आंदोलनावर जहरी टीका करुन फॅसिस्ट शक्तींना बळ देत असाल तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख, मुर्दाड आणि आत्मघातकी आहात. #एक_मराठा_लाख_मराठा #जय_शिवराय_जय_भीम.”
मनोज जरांगे पाटलांचं किरण मानेंनी केलं कौतुक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी अन्नाचा त्याग करत उपोषण सुरू केलं आहे. त्यांचं किरण माने यांनी कौतुक केलं आहे. ते म्हणतात, “जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता.”
हे ही वाचा >> Maratha Reservation History : पहिल्यांदा कधी झाली होती मागणी? असा आहे इतिहास
“आजच्या भवतालात संविधान गुंडाळू पहाणार्या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करताहात ! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे”, अशी विनंतीही किरण माने यांनी केली आहे.
शत्रूची चाल ओळखा… किरण माने नेमकं काय म्हणाले?
आणखी एका पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “शत्रू कावेबाज असताना कशावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं घातक ठरू शकतं. जाळपोळ करणारे नक्की कोण आहेत? ते सिलेक्टेड ठिकाणीच हिंसा करत असतील, तर त्यामागे काय हेतू असू शकतो?”, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation : “आपापली व्होटबँक…”, संभाजीराजेंनी सर्वच नेत्यांवर ओढले ताशेरे
पुढे ते म्हणतात, “यामागचा कारण-कार्य-संबंध जाणून घ्यायला हवा. पिसाळलेला हत्ती दिसेल ते उद्ध्वस्त करतो. ठरवून विशिष्ट ठिकाणी जाऊन तोडफोड करत नाही. सावध राहून शत्रूची चाल ओळखा. एक मराठा, लाख मराठा”, असा सल्लाही माने यांनी मराठा आंदोलकांना दिला आहे.
ADVERTISEMENT