अभिनेता हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज सिनेमाचा एक टिझर रिलीज करून एक झलक दाखवण्यात आली होती. या सिनेमाच्या टिझरला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही झिम्मा या मराठी सिनेमाच्या टिझरची दखल घेतली आहे.
ADVERTISEMENT
झिम्मा सिनेमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा होणारी धमाल दाखवण्यात आहे. तर आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी झिम्मा या सिनेमाचा टिझर ट्विटरवर शेअर केला आहे. अमिताभ त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “सात बाई सात… बायका सात! जिवाची सफर… आता राणीच्या देशात!”
आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘झिम्मा’चा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पाहता येणार आहे. या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर देखील झळकणार आहे.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. तर आज रिलीज झालेला टिझर पाहून तरी ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचं एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा असणार आहे. येत्या 23 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
ADVERTISEMENT