Ravindra Mahajani News : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (14 जुलै) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह घरात पडलेला होता. ते 77 वर्षांचे होते. अभिनेता गश्मीर महाजनी त्यांचा मुलगा आहे. (veteran actor ravindra mahajani passed away)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र महाजनी हे तळेगाव परिसरात असलेल्या घरी एकटेच राहायचे. दरम्यान मागील दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. घरात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने शेजाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
पोलिसांनी दरवाजा उघडला अन्…
रवींद्र महाजनी यांच्या घराचा दरवाजा काही दिवसांपासून बंद असल्याबद्दलची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर आत पाहणी केली असता रवींद्र महाजनी यांचा बाथरुमजवळ मृतदेह आढळून आला.
दोन-तीन दिवसांपूर्वीच मृत्यू
पोलिसांनी पाहणी केल्यानंतर असा अंदाज व्यक्त केला की, रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वीच झाला असावा. पाय घसरून ते पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली.
वाचा >> Crime : ‘या’ अॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला होता, पण त्यांचं बालपण मुंबईत गेले. त्यांचे वडील पत्रकार होते. त्यांना सुरूवातीपासूनच अभिनयाची आवड होती. 1975 ते 1990 या काळात रविंद्र महाजनी यांनी अनेक मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. झुंज, देवता, मुंबईचा फौजदार, आराम हराम आहे, लक्ष्मीची पावले, पानिपत हे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावले.
एकनाथ शिंदे, शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.
वाचा >> खातेवाटप कोणाला ठरला लाभदायक?, कोणत्या मंत्र्याने कमावलं, कोणी गमावलं?
“आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT