प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून ते 73 वर्षांचे होते. छातीत त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
गेल्या दोन आठवड्यांपासून झाकीर हुसेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र नंतर त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. झाकीर हुसेन यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
झाकीर हुसेन यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अँटोनिया मिनेकोला, त्यांच्या दोन मुली अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी, त्यांचे भाऊ तौफिक आणि फजल कुरेशी आणि त्यांची बहीण खुर्शीद असा परिवार आहे.
हे ही वाचा >> Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ! पण अजितदादा म्हणाले, "काहींना अडीच वर्षांसाठी..."
1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण
झाकीर हुसेन हे त्यांच्या पिढीतील महान तबलावादक मानले जातात. झाकीर हुसेन, भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांपैकी एक असून, त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाच ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील महान तबलावादक उस्ताद अल्ला राखा कुरैशी हे होते. आईचं नाव बीवी बेगम असं होतं.
'शक्ती' हा फ्युजन बँड
गेल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी देशातील आणि जगातील अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं. इंग्लिश गिटार वादक जॉन मॅक्लॉफलिनने भारतीय व्हायोलिन वादक एल. शंकर, तबलावादक झाकीर हुसैन आणि टी.एच. 'विक्कू' विनायकरामसोबत 'शक्ती' हा फ्युजन बँड सुरू केला, पण 1977 नंतर हा बँड फारसा सक्रिय राहिला नाही.
1997 मध्ये जॉन मॅक्लॉफलिनने त्याच संकल्पनेवर पुन्हा 'रिमेम्बर शक्ती' नावाचा बँड तयार केला आणि त्यात व्ही. सेल्वागणेश (टी.एच. 'विक्कू' विनायकरामचा मुलगा), मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास आणि शंकर महादेवन यांचा समावेश होता. 2020 मध्ये, बँड पुन्हा एकत्र आला आणि 'शक्ती' म्हणून त्यांनी 46 वर्षांनंतर त्यांचा पहिला अल्बम 'दिस मोमेंट्स' रिलीज केला.
ADVERTISEMENT