Devendra Fadnavis : मध्यप्रदेश, राजस्थानचा फॉर्म्युला महाराष्ट्रात का नाही चालला? फडणवीस पुन्हा येण्याची 10 कारणं

सुधीर काकडे

04 Dec 2024 (अपडेटेड: 04 Dec 2024, 04:04 PM)

मध्यप्रदेशमधील विजयानंतर भाजपने विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या जागी ओबीसी चेहरा मोहन यादव यांच्यावर मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवली होती. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याऐवजी चेहरा भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार!

point

भाजपने महाराष्ट्रात धक्कातंत्र का नाही वापरलं?

point

मागच्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडीची टाईम लाईन

Devendra  Fadnavis is New CM of Maharashtra : देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गटनेते म्हणून निवड झाली. यांच्या नावाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. आता 5 डिसेंबर म्हणजे उद्या संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी ते शपथ घेणार आहेत. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, धक्कातंत्रातून नवा चेहरा देण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला आहे. मात्र, भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान किंवा हरियाणाचाच फॉर्म्युला  महाराष्ट्रात का राबवला नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. मध्यप्रदेशमधील विजयानंतर भाजपने विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या जागी ओबीसी चेहरा मोहन यादव यांच्यावर मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवली होती. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याऐवजी ब्राह्मण चेहरा भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. तसंच हरियाणातही यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या 5 महिने आधी भाजपने मुख्यमंत्री चेहरा बदलून मनोहर लाल खट्टर यांच्या जागी ओबीसी चेहरा नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केलं. मात्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी का देण्यात आली हे दहा मुद्द्यांमधून समजून घेऊ.

हे वाचलं का?


1. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील अनुभवी नेते असून, ते आता सहाव्या वेळा आमदार आहेत. सरकारमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चेहरा देण्याची जोखीम पत्करणं भाजपसाठी धोकादायक ठरू शकलं असतं. 

2. फडणवीस 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2022 पासून ते आतापर्यंत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. फडणवीस 1999 पासून दक्षिण पश्चिम नागपूरचे आमदार आहेत. यावेळी त्यांनी सहाव्यांदा निवडणूक जिंकली आहे. याआधी ते नागपूर महापालिकेचे महापौरही होते.

3. देवेंद्र फडणवीस यांना 2019 मध्ये खऱ्या राजकीय परीक्षेला सामोरे जावं लागलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आणि उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडल्यानंतर राजकीय उलथापालथ झाली, तेव्हा फडणवीस खंबीरपणे उभे राहिले आणि निवडणुकीपूर्वी भाजपने उद्धव ठाकरेंना कोणताही शब्द दिला नव्हता हे त्यांनी ठामपणे सांगितलं.


4. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं, तेव्हा फडणवीस विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत आले आणि कोरोनाच्या काळातील अराजकतेपासून भ्रष्टाचारापर्यंतच्या प्रकरणांमध्ये उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली होती. यावेळी त्यांनी स्वत:ला प्रस्थापित नेता म्हणून स्वत:ला सिद्ध केलं. त्यानंतर झालेल्या सर्व राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी पक्षासाठी सर्व जोखीम पत्करली.

5. 2022 मध्ये, जेव्हा शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे एनडीएमध्ये सहभागी झाले, तेव्हा सर्व प्रकारचे प्रयत्न करुन त्यांनी मोठ्या राजकीय आव्हानांना तोंड देत राज्यात सराकर स्थापन करुन दाखवलं.
 

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : सगळ्यांच्या मनातल्या सगळ्याच गोष्टी पूर्ण करता येत नाही... पहिल्याच भाषणात काय म्हणाले फडणवीस?

6. शेवटच्या क्षणी जेव्हा भाजप हायकमांडने फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी निर्णय स्वीकारण्यास क्षणाचाही विलंब न लावता, शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. त्यामुले पक्षासाठी त्यांनी त्याग केल्याचं बोललं जात होतं.

7. महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या, मात्र 2022 च्या निवडणुकीनंतर जेव्हा NDA सरकार स्थापन झाले तेव्हा भाजपच्या कोट्यातून फक्त 10 मंत्री करण्यात आले.तर शिवसेनेच्या 40 आमदारांच्या कोट्यातून 10 मंत्री करण्यात आले. यावेळीही त्यांनी राजकीय चातुर्य दाखवलं आणि सोबत आलेल्या पक्षांना आम्ही संधी देत असल्याचा संदेश दिला.

8. 2023 मध्येही फडणवीसांनी पुन्हा एक आव्हान स्वीकारत अजित पवार यांच्यासह 42 आमदारांसह सोबत घेतलं. तेव्हा शिंदेच्या शिवसेनेतील नाराजी सांभाळत त्यांनी अजित पवारांच्या 9 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. विशेष म्हणजे भाजप-शिवसेनेतून एकाही मंत्र्याला पायउतार न करता त्यांनी हे सगळं केलं. अजित पवार गटाला सत्तेत वाटा देण्यासाठी भाजपने सर्वाधिक सहा खाती  सोडली. तर शिंदे गटानेही पाच मंत्रीपदं सोडली होती. कृषी, अर्थ, सहकार अशी मोठी मंत्रीपदंही राष्ट्रवादीकडे गेली होती.

हे ही वाचा >> Sukhbir Singh Badal attack : सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा पाकिस्तानातून आला? कोण आहे नारायणसिंग?

9. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आणि फक्त 9 जागा जिंकता आल्या होत्या. तर 2019 मध्ये भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या लोकसभेतून पराभवानंतर जनतेचा मूड ओळखून आपली रणनीती बदलली. राज्य सरकारने लाडकी बहीन सारख्या गेम चेंजर योजना आणल्या आणि 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात त्याचे फायदे दिसून आले.

10. या विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर मोठं आव्हान होतं ते राज्यातील जातीय समीकरणांचं. कारण मराठा आरक्षणासारखं एक मोठं आंदोलन, त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी वाद अशा सर्व गोष्टी हाताळत महायुतीने मोठ्या ताकदीनं आणि युक्तीनं या सर्व गोष्टींमधून मार्ग काढला. 

एकूणच, 2019 ते 2024 मध्ये घडलेल्या सर्व घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्तानं दिलेली जबाबदारी पूर्ण पार पाडली. तसंच अनेकदा त्यांना राजकीय जोखीमही घ्यावी लागली. त्यामुळे राज्यातील भाजपच्या अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यानं देवेंद्र फडणवीस यांना  मुख्यमंत्रिपद देणंच भाजपने उचित समजत हा निर्णय घेतला असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 

 

    follow whatsapp