Sankarshan Karhade Poem : "विरोधकच नसल्यानं, मुख्यमंत्रिपदाचं कोडंही लवकर सुटेल", संकर्षण कऱ्हाडेची कविता पुन्हा व्हायरल

राजकारणाकडे पाहणाऱ्या सर्वसामान्यांना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची एक कविता सध्या चांगलीच भावताना दिसते आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Nov 2024 (अपडेटेड: 30 Nov 2024, 11:02 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

point

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेना...

point

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची कविता व्हायरल

राज्यातील निवडणुका पार पडून आठवडाही उलटून गेला असताना मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा अजून सुटत नाहीये. दिल्लीत, मुंबईत बैठकांचा सिलसिला सुरूच आहे. मात्र अजूनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसेना. अशातच राजकारणाकडे पाहणाऱ्या सर्वसामान्यांना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची एक कविता सध्या चांगलीच भावताना दिसते आहे. संकर्षण कऱ्हाडे एका माध्यम कार्यालयात गेला असताना तिथे त्यानं सादर केलेली एक कविता सध्या चांगलीच व्हायरल होते आहे. 

हे वाचलं का?

संकर्षणची कविता नेमकी काय? 

हे ही वाचा >>Murlidhar Mohol : "माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा...", पहिल्याच टर्ममध्ये केंद्रात मंत्रिपद मिळालेले मोहोळ काय म्हणाले?

 

सगळी गावं तुझीच आहेत,
तू अर्ज भरून पाहावं...
मला वाटतं पांडुरंगा तू 
एकदा निवडणुकीला उभं राहावं... 

मग ना पावसातल्या सभा, 
ना प्रचाराचा घाम, 
तुझे स्टारप्रचारक देवा
ग्यानबा तुकाराम...

प्रचाराच्या जाहिरातीत 
ओव्या कानी  पडतील, 
बॅनर बघून विट येण्यापेक्षा 
हात जोडले जातील... 

सगळं सुखाचं होईल देवा
विपरीत काही घडणार नाही,
तू सगळ्यांचा असल्यानं
एकही मत जात पाहून पडणार नाही

तुझा कुणी विरोधक नसल्यानं 
सगळ्यांना बरंच वाटंल,
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? 
हे कोडंही लवकर सुटल...

पहिली टर्म असली तरी,
बिनविरोध येशील, 
भल्याभल्यांना तुझ्या 
मंत्रिमंडळात घेशील... 

पहिलाच निर्णय 
देवा असा घे, कायद्या सोबत, 
गृहखातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे

मग काय टाप कुणाची 
कोण कायदा हातात घेईल? 
एका नजरेत देवा सगळा 
महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल

 हे ही वाचा >>अमित शाहांसोबतचे 'ते' दोन फोटो शिंदेंनी का केले नाही शेअर?, अचानक निघून गेले गावी!

लाडक्या भावांवरचं समान प्रेम
जिचं आदर्श म्हणून पाहावं, 
त्या मुक्ताईकडं देवा
महिला व बालविकास हे खातं जावं...

साक्षरतेचे तर देवा काय दिवस येतील,
बुद्धीला वैभव म्हणणारे ज्ञानदेव शिक्षण मंत्री होतील 
 
अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून
जे स्वत: खाली बुडलं...
जे सदेह आले स्वर्ग
आणि तू दार उघडलं... 

त्या तुकोबांच्या दे पुन्हा 
हिशोबाच्या वह्या
आणि अर्थमंत्री म्हणून 
ताबडतोब घे त्यांच्या सह्या...

एकदम झाला आवाज हो..
लखलख वीज कडाडली...
वीटेवरचे सावळी माऊली 
माझ्यावर चिडली

काय लावली तू ही बडबडे...
हे सगळं होणं अशक्य आणि अवघडहे...

या थोरांना मंत्री करुन 
तू मला CM करतो, हो रे...
राजकारणात यांच्या नावाचा 
होतो तेवढा वापर पुरे... 

राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोय म्हणून ऐकतोय,
ऐक आता एक उपाय मन लावून सांगतोय... 
माऊलीच्या रुपातला विठ्ठल बापासाराखा वागला... 
जबाबदारीनं राष्ट्रासाठी पुढं बोलू लागला... 
मला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही कुणी वाचता? 
मग कसं काय रे त्या जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचतात... 

या सर्वांना तुम्ही सोयीनुसार जातींमध्ये वाटलं...
डोक्यावर घेतलं तुम्ही डोक्यामध्ये नाही घेतलं... 
प्रत्येकात तुका-शिवाजी आहे जर विचारांचा घेतला वसा...
सुराज्यासाठीच काम करा, मग कुणीही खुर्चीत बसा... 

कर्तृत्वाची वेळ आहे आता, नको नुसती बडबड
आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड... 

आम्ही सगळे पाठीशी आहोत, तुम्ही खुशाल राहा...
समोर महाराष्ट्र उभाय त्याच्यात पांडुरंग पाहा...

 

    follow whatsapp