माढा: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले काही मतदारसंघ फार चर्चेत राहिले. त्यापैकी एक म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. भाकरी फिरवण्यात एक्स्पर्ट मानले जाणारे शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. यासाठी त्यांनी आपल्यापासून काही काळ दूर गेलेल्या मोहिते-पाटलांना पुन्हा जवळ केलं आणि भाजपला मात देत विजयाची तुतारी वाजवली. आता लोकसभेनंतर विधानसभेसाठी पवारांनी एक-एक डाव टाकायला सुरुवात केलीय. (sharad pawar has started making a new move for madha assembly elections will ajit pawar be in trouble again)
ADVERTISEMENT
माढ्यात देखील विधानसभेसाठी पवारांनी डाव टाकलाय. ज्यामुळं अजितदादांच्या सोबत गेलेल्या बबनदादांची गोची झालीय असं म्हणावं लागेल. बबनदादांच्या सख्ख्या भावालाच आता पवार त्यांच्या विरोधात उभे करतील असं बोललं जाऊ लागलंय. याला कारण ठरलंय रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांची विमानात घेतलेली भेट. सुळे आणि रमेश शिंदेंच्या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळं माढ्यातली गणित नेमकी कशी बदलणार आहेत हेच आपण जाणून घेऊयात
पवार पुन्हा माढ्यात टाकणार नवा डाव?
लोकसभेला काही मतदारसंघातील लढतींचं चित्र हे देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असंच झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामध्ये माढ्याचा सुद्धा समावेश होता. बऱ्याच शह-काटशहानंतर अखेर फडणवीसांचे खास असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव पवारांकडे आलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी केला. आणि शेवटी या रेसमध्ये पवारांनी बाजी मारली.
हे ही वाचा>> Narayan Rane : "शरद पवार अस्वस्थ झाले असते, तर ८४ वर्ष जगले नसते", राणेंचं विधान
माढ्यात लोकसभेनंतर गणितं मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. आता एका एका विधानसभा मतदारसंघात चुरस वाढताना दिसतेय. अशात माढा विधानसभा मतदारसंघाकडेही सर्वाचं लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर बबन शिंदे हे अजितदादांसोबत गेले. त्यामुळं आता हा पारंपारिक राष्ट्रवादीचा असलेला मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शरद पवार आणि अजित पवार दोघेही करणार हे नक्की.
अशात आता माढ्यातील अजित पवार गटाचे आमदार बबन दादा शिंदे यांचे सख्खे लहान बंधू रमेश शिंदे यांनी दिल्लीत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यामुळं आगामी निवडणुकीत माढ्याचे आमदार बबन शिंदे व त्यांचे सख्खे बंधु रमेश शिंदे या दोघांत राजकीय संघर्ष होणार असल्याचं बोललं जातंय. सहा वेळा माढा विधानसभेतून आमदार झालेले बबन शिंदे यंदा आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा मैदानात उतरवणार असल्याचं बोललं जातंय. आता रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याने त्यांच्याकडून तुतारी वाजवली जाईल असं बोललं जातंय. रमेश शिंदे यांचे पुत्र आणि बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
हे ही वाचा>> Madha Lok Sabha Election 2024 : ''माढा मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार'', देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका
माढ्यातील शिंदे कुटुंबातून सध्या दोन आमदार आहेत. बबन शिंदे हे माढ्यातून आमदार आहेत, तर त्यांचे बंधू संजय शिंदे करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आता रमेश शिंदे यांनीही स्वत:च्या लेकासाठी फिल्डींग लावल्याचं दिसून येतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांसोबत होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला. त्यामुळे माढा विधानसभेत शरद पवार गटाने नव्या उमेदवाराचा शोध सुरु केला.
लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर धैर्यशील मोहिते पाटलांना माढा विधानसभा मतदारसंघातून भरघोस लीड मिळालाय. भाजपचे उमेदवार असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढा विधानसभेतून 70055 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना 122570 मतं मिळालीत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बबन शिंदे यांनी 67 हजारांहून अधिक मतं घेत सहाव्यांदा विधानसभा गाठली होती. मात्र लोकसभेला धैर्यशील मोहितेंना 52 हजारांचा लीड मिळाला. त्यामुळं अशीही बबन शिंदे यांची धाकधूक वाढलेली आहे. अशात आता जर शरद पवारांनी घरातूनच चॅलेंज उभं केलं तर बबनदादांची वाट अवघड असू शकते असं बोललं जातंय..
ADVERTISEMENT