Ajit Pawar Lalbaugcha Raja : अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भूमिका मांडलीये. भाजपबरोबर गेल्यापासून तर सातत्याने ते मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होतेय. त्यातच आता एका चिठ्ठीने या चर्चेत रंग भरला आहे. अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांने लालबागचा राजाला तसं साकडंच घातलंय. हा प्रकार नेमका काय ते समजून घ्या…
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेऊन अजित पवार भाजपसोबत गेले. सत्तेत जाताच उपमुख्यमंत्री झाले. पण, एकनाथ शिंदेंची आमदारकी जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा या राजकीय भूकंपानंतर सतत होताहेत. दुसरीकडे अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं बघण्यासाठी त्यांचे नेते आणि कार्यकर्ते चातकासारखे आतूर झाले आहेत.
हेही वाचा >> सुप्रीम कोर्टानं वापरलेले ‘हे’ दोन शब्द… अन् CM शिंदेंचं भवितव्य
अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स, होर्डिंग्जही उत्साही कार्यकर्त्यांकडून लावल्या गेल्या. कार्यकर्त्यांच्या अशाच उत्साहीपणामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्री पद ही चर्चा कायम जिवंत आहे. अशातच अजित पवार प्रेमी कार्यकर्त्यांने थेट लालबागचा राजाच्या दरबारात विनवणी केलीये.
अजित पवारांना मुख्यमंत्री होऊदे… त्या चिठ्ठीत काय?
लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याने राजाच्या चरणी एक चिठ्ठी ठेवली. ही चिठ्ठी चर्चेचा विषय ठरली आहे. ही चिठ्ठी राजाच्या चरणी ठेवत कार्यकर्त्याने सांकडं घातलंय.
हेही वाचा >> शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार! असं आहे सुनावणी वेळापत्रक
या चिठ्ठीत लिहिलंय की, ‘हे लालबागच्या राजा आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे.’
अजित पवार मुख्यमंत्री पदाबद्दल काय म्हणालेले?
“माझे फ्लेक्स लागले तेव्हा कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, असे फ्लेक्स लावून काही उपयोग होत नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळतं. कुणी कोणाचे फ्लेक्स लावायचे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे मॅजिक फिगर म्हणजे 145 चा आकडा आहे; तोच मुख्यमंत्री होतो… अन्यथा केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहतं”, असं अजित पवार भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबद्दल बोलले होते.
ADVERTISEMENT