सातारा: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता. या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट पत्रकाराचा माइकच झिडकारला. हा प्रकार समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे एवढे का चिडले? असा सवाल आता विचारला जात आहे.
ADVERTISEMENT
नेमकं घडलं तरी काय?
19 एप्रिल 2025 रोजी दुपारी एकनाथ शिंदे हे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर TV9 मराठी या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला. "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे?" असा प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे हे एका क्षणात प्रचंड चिडले. यावेळी त्यांनी पत्रकाराचा माइकच झिडकारला. 'अरे जाऊ दे यार.. काय तू कामाचं बोला यार...' असं म्हणत या मुद्द्यावर काहीही बोलतान थेट काढता पाय घेतला.
हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: 'भांडण मिटवून टाकलं...', उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार!
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, X वर @yogi_9696 या हँडलने हा व्हिडिओ शेअर करत "दोघे एकत्र येण्याअगोदर फक्त चर्चा ऐकूनच इतकी चिडचिड!" असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना बरंच ट्रोल केलं जात आहे.
एकनाथ शिंदे एवढे का संतापले?
एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेमागे अनेक राजकीय कारणे असू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
- शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य जवळीक:
एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेऊन स्वत:चा गट स्थापन केला आणि भाजपसोबत युती करून सत्तेत सहभागी झाले. या दरम्यान, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध सुधारले होते. 17 एप्रिल 2025 रोजीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली होती, ज्यामुळे मनसे आणि शिंदे गटात युतीची शक्यता वर्तवली जात होती मात्र, आता राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले, तर शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. विशेषत: ठाणे आणि मुंबईसारख्या भागात, जिथे मनसेचा प्रभाव आहे, तिथे शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> 'एवढ्या लोकांना धोका देणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा?', मनसेच्या 'त्या' नेत्याच्या तिरक्या विधानाचा अर्थ काय?
- महायुतीतील अंतर्गत तणाव:
महायुती आघाडीत (भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट) सध्या सर्व काही आलबेल नाही. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातील संबंधांवर ताण असल्याच्या बातम्या गेल्या काही काळापासून येत आहेत. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केल्यास, शिंदे गटाची राजकीय रणनीती कोलमडण्याची भीती आहे. यामुळे शिंदे यांच्यावर मानसिक दबाव असण्याची शक्यता आहे.
- वैयक्तिक आणि राजकीय स्पर्धा:
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वैर आता सर्वश्रुत आहे. 2022 मध्ये शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. त्यानंतर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले, ज्याचा राग उद्धव ठाकरे यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चा खऱ्या ठरतात की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, या चर्चांनी एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील इतर नेत्यांनाही अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोणताही नेते आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या मनातील अस्वस्थता समोर आली असली, तरी याचा त्यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
ADVERTISEMENT
