Sharad Pawar Vs Sanjay Raut : ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कोणताही विचार दिल्लीतील नेत्यांच्या मनात नाही”, असं विधान शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलं आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईला तोडण्याचा डाव असल्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर पवारांचं हे मत समोर आल्यानंतर दोन्ही पक्षाची अडचण झाली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
‘मुंबई तोडण्याचा डाव नाही’, शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, “मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो.”
संजय राऊतांचा विरोधी सूर, काय मांडली भूमिका?
शरद पवारांच्या याच भूमिकेबद्दल खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विरोधी सूर लावला. त्याचबरोबर दिल्लीतील भाजप नेतृत्वालाही राऊतांनी लक्ष्य केलं.
संजय राऊत म्हणाले, “नाही, असा पूर्णविराम लागू शकत नाही. कारण मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव तर होताच. मग 105 हुतात्मे का मेले? 105 हुतात्मे मुंबईसाठीच मेले ना. याचा विसर कुणालाही पडू नये. वारंवार मुंबईवर हल्ले होताहेत, ते कशासाठी होताहेत? मुंबईला आर्थिक, सामाजिक, भौगोलिकदृष्ट्या कमजोर करणं म्हणजेच मुंबई तोडण्याचा डाव आहे.”
हेही वाचा >> मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट
“मुंबईतून उद्योग पळवून नेणं, मुंबईचे प्रकल्प नेणं. मुंबईवरती सातत्याने आर्थिक अतिक्रमणं करणं. याचा अर्थ काय? मुंबईतून मराठी माणसाचं उच्चाटन करण्याला मदत करणं, अशा अनेक गोष्टी म्हणजे मुंबई भविष्यात महाराष्ट्रात नये, राहिली तर अत्यंत विकलांग अवस्थेत, बेवारशासारखी पडून राहावी”, असं विधान राऊतांनी केलं आहे.
वसंतदादांचा दाखला, राऊत पवारांच्या विधानावर काय बोलले?
“याआधीचे सगळे प्रमुख लोकं, मग काँग्रेसचे असतील… वसंतदादा पाटलांपासून वसंतराव नाईकांपर्यंत. या सगळ्यांनीच मुंबईचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेबरोबर. वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना जाहीरपणे सांगितलं होतं की, दिल्लीत अशा प्रकारचं कारस्थान सुरू आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, हे वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना केलेलं विधान विसरता येणार नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा >> शरद पवारांचा राजीनामा : ‘सामना’तून पुन्हा अजित पवारांबद्दल शंका, दोन सवाल
“मुंबईला भांडवलदारांची बटिक करण्याचा काम आजही सुरू आहे. तेव्हाही झालं, आता ते जास्त होतं आहे. आता ते अधिक प्रकर्षाने जाणवत आहेत, कारण आताचे राज्यकर्ते गुजरातचे आहेत”, असं सांगत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी, अमित शाहांनाही लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT