नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज (7 जुलै) पार पडला. यावेळी तब्बल 43 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यापैकी 15 जणांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. ज्यामध्ये सध्या मंत्रिमंडळात असणाऱ्या काही मंत्र्यांचं प्रमोशन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारबाबत जेव्हा चर्चा सुरु झाली तेव्हा या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार यावरुन बरीच खलबतं सुरु होती. अखेर 15 जणांना कॅबिनेट मंत्री म्हणून नव्याने मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
कॅबिनेट मंत्रिपदी ‘या’ 15 जणांची वर्णी
1. नारायण राणे (Shri Narayan Tatu Rane) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार नारायण राणे यांची आता कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरु केलेल्या राणेंनी आता थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे.
2. सर्बानंद सोनोवाल (Shri Sarbananda Sonowal) – आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना देखील कॅबिनेट मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
3. डॉ. वीरेंद्र कुमार (Dr. Virendra Kumar) – मध्यप्रदेशमधून तब्बल 7 वेळा लोकसभेत निवडून जाणाऱ्या वीरेंद्र कुमार यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून आता नियुक्त करण्यात आलं आहे.
4. ज्योतिरादित्य सिंधिया (Shri Jyotiraditya M Scindia) – मध्यप्रदेशमधील सर्वात प्रभावी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते पाच वेळा खासदार राहिले आहेत.
5. रामचंद्र प्रसाद सिंह (Shri Ramchandra Prasad Singh) – बिहारमधून दुसऱ्यांदा राज्यसभेवर गेलेले रामचंद्र प्रसाद सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ते 1984 सालचे IAS अधिकारी होते. 25 वर्ष प्रशासकीय सेवेत घालविल्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले.
6. अश्विनी वैष्णव (Shri Ashwini Vaishnaw) – अश्विनी वैष्णव हे देखील आयएएस अधिकारी होते. मूळचे ओडिशाचे असलेले अश्विनी वैष्णव हे सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांना देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे.
7. पशुपति कुमार पारस (Shri Pashu Pati Kumar Paras) – लोजपचे खासदार आणि बिहारमधील हेवीवेट राजकारणी अशी ओळख असलेल्या पशुपति कुमार पारस यांची कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
8. किरेन रिजिजु (Shri Kiren Rijiju) – किरेन रिजिजू हे मोदींच्या मंत्रिमंडळात आधीपासूनच राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे.
9. राज कुमार सिंह (Shri Raj Kumar Singh) – मणिपूरमधून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेले राजकुमार सिंह यांनाही कॅबिनेट मंत्रिपद म्हणून शपथ देण्यात आली आहे.
10. हरदीप सिंह पुरी (Shri Hardeep Singh Puri) – नागरी उड्डाण वाहतूक राज्यमंत्री असलेल्या हरदीप सिंह पुरी यांना बढती देण्यात आली आहे. राज्यमंत्री असलेल्या हरदीप सिंह यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
11. मनसुख मांडविया (Shri Mansukh Mandaviya) – गुजरातमधील मनसुख मांडविया यांना देखील कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे. बंदरे विकास व जहाज राज्यमंत्री असलेल्या मनसुख मांडविया कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
12. भूपेंद्र यादव (Shri Bhupender Yadav) – राज्यसभेवर खासदार असलेल्या भूपेंद्र यादव यांची आता थेट कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Modi Government’s Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न, कोणाकोणाला मिळालं मंत्रिमंडळात स्थान?
13. पुरुषोत्तम रुपाला (Shri Parshottam Rupala) – पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात पुरुषोत्तम रुपाला यांनाही बढती देण्यात आली आहे. ते कॅबिनेट मंत्री म्हणून यापुढे काम पाहतील.
14. जी किशन रेड्डी (Shri G. Kishan Reddy) – केंद्रात गृहराज्यमंत्री असलेल्या तेलंगणाच्या जी किशन रेड्डी यांना बढती देण्यात आली आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. पण यामुळे आता त्यांना नेमकं कोणतं खातं मिळतं हे पाहणं गरजेचं आहे.
15. अनुराग सिंह ठाकूर (Shri Anurag Singh Thakur) – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालं आहे. कॅबिनेट मंत्रीपदी प्रमोशन झालेल्या अनुराग ठाकूर यांना कोणती जबाबदारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT