संपूर्ण देशासह महाराष्ट्रालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला. गेल्या काही महिन्यांपासून या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळुहळु नियंत्रणात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चक्रीवादळात काम करणाऱ्या यंत्रणेचं कौतुक करण्यापासून ते कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार काय-काय प्रयत्न करत आहे याची माहिती घेतली. याव्यतिरीक्त राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवले जाणार असून रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले जाणार आहे.
महाराष्ट्रात Lockdown 15 दिवसांनी वाढला,’या’ जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून निर्बंध काही अंशी शिथील
जाणून घेऊयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातले ठळक महत्वाचे मुद्दे –
१) राज्यातील निर्बंधांमध्ये १५ जूनपर्यंत वाढ – परंतू हे निर्बंध लागू करतना सरसकट निर्णय घेताना जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि बेड्सची संख्या लक्षात घेतली जाणार आहे. ज्या भागांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आहे तिकडे निर्बंध शिथील केले जाणार आहेत. यावेळी बोलत असताना शहरी भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरीही ग्रामीण भागात वाढणाऱ्या संख्येबद्दल मुख्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त केली.
२) वारंवार येणाऱ्या चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना – तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकून गेलं. या काळात राज्यातल्या यंत्रणेने चांगलं काम केलं. या वादळात नुकसान सोसावं लागणाऱ्या सर्वांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाणार आहे. परंतू चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मदतीसाठीच्या निकषांमध्ये बदल करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.
३) नुकसान भरपाईची घोषणा न करता प्रत्यक्ष भरपाई द्यायला सुरुवात – तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना राज्य शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केली आहे असंही ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
४) शिवभोजन थाळीत ५४ ते ५५ लाख थाळ्यांचं मोफत वितरण – लॉकडाउन काळात राज्यातील गोरगरिब जनतेसाठी शिवभोजन थाळी हक्काचं साधन ठरली असून येणाऱ्या काळातही हा उपक्रम कायम ठेवला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
५) याव्यतिरीक्त अन्नसुरक्षा योजने अंतर्गत २.७४ लाख मेट्रीक टन धान्याचं वाटप करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
६) लॉकडाउनचा फटका बसलेल्या १० लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी १५४.५५ लाखांचा निधी थेट बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
७) राज्यातील फेरीवाल्यांसाठी ५२ कोटींचा निधी थेट खात्यात देण्यात आल्याचं ठाकरेंनी सांगितलं.
८) यावेळी बोलत असताना राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आलेलं असलं तरीही कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप संपलेली नाही. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
९) जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या लढाईसाठी ३ हजार ८६५ कोटींचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिला आहे.
१०) राज्यातील जनतेवर निर्बंध लादणं हे माझ्यासाठी कटुच पण जनतेच्या सुरक्षेसाठी आणि काळजीपोटी हे करावंच लागत असल्याचं ठाकरे म्हणाले.
११) या काळात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या २ वरुन ६०० वर नेण्यात आल्याचा पुनरोच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
१२) जून महिन्यात लसीचा पुरवठा सुरळीत होणार असून लसीकरणाचा वेग वाढवण्याकडे सरकारचा कल असेल हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात लसीचा तुटवडा असल्यामुळे अनेक केंद्रांवर लसीकरण बंद आहे.
१३) राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी पेलवण्यासाठी राज्य सरकार खंबीर आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
१४) मृत्यू दर कमी करण्यासाठी वेळीच माझा डॉक्टरांशी संपर्क साधावा
१५) १२ वीच्या परीक्षांबाबत आढावा घेत आहोत, लवकरच याबाबतचं धोरण आम्ही जाहीर करु. दरम्यान केंद्रानेही परीक्षांबाबतचं धोरण जाहीर करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
१६) भविष्यात येऊ शकणारी तिसरी लाट पाहता प्रौढांमुळे लहानांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही, लॉकडाउनला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
ADVERTISEMENT