अकोला जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात सहलीसाठी गेलेल्या १७ मित्रांना मोठा धक्का बसला आहे. तेलंगणा राज्यातील बासर येथे गोदावरी नदीत मौजमस्ती करण्यासाठी उतरले असता १७ पैकी दोन मित्रांना नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
या दोन्ही मित्रांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर तेलंगणा येथील भायनसा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.
अकोल्यातील भौरद आणि शहर परिसरात राहणाऱ्या १७ मित्रांचा ग्रूप तेलंगणा राज्यात फिरायला गेला होता. शनिवारी पहाटे हे मित्र तेलंगणा राज्यातील बासर येथे पोहचले. यावेळी सर्व मित्र गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरले. यापैकी प्रतीक गावंडे (वय २२) आणि किरण लटकुटे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने या दोघांचेही मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच दोन्ही मुलांचे नातेवाईक हे भायनसा येथे दाखल झाले आहेत. प्रतीक आणि किरण यांच्या मृत्यूची माहिती कळताच दोघांच्याही परिवाराला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे अकोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT