कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातले 20 कैदी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या सगळ्यांना ठाणे सिव्हिल रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
कोरोना काळात बाहेरून येणाऱ्या कैद्यांमुळे आधीत तुरुंगात असलेल्या कैद्यांना कोरोना होऊ नये म्हणून या कैद्यांची व्यवस्था डॉन बॉस्को शाळेत करण्यात आली होती. या ठिकाणी नव्याने आणलेल्या कैद्यांना ठेवलं जात होतं. या ठिकाणी साधारण 150 कैदी होते. ज्यांची RTPCR चाचणी करण्यात आली. या चाचणीत 20 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कैद्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कैद्यांना आता क्वारंटाईन करण्यात आलं आहे. डॉक्टरांकडूनही या क्वारंटाईन झालेल्या कैद्यांवर लक्ष ठेवलं जातं आहे. मेडिकल टीमकडून हे प्रयत्न केले जात आहेत की लवकरात लवकर कैद्यांवर उपचार केले जातील आणि त्यांना पुन्हा तुरूंगात पाठवलं जाईल. तुरुंगात कोरोनाचा शिरकाव कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अधिकारी वर्गाकडून आता ही माहिती मिळवली जाते आहे की कोरोनाचा शिरकाव तुरूंगात कसा झाला?
मुंबईत 18 महिन्यांनी पहिल्यांदा शून्य मृत्यूंची नोंद
एकीकडे ही बातमी समोर आली असली तरीही दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानीला अर्थात मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत १८ महिन्यानंतर काल पहिल्यांदाच शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाच्या दोन लाटांमुळे मुंबई विस्कळीत झाली होती. दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता मुंबई पुन्हा पूर्वपदावर येते आहे.
रविवारी समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईत दिवसभरात 367 कोरोना बाधित नवे रूग्ण आढळून आले. तर 518 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईतील एकूण कोरोना मृतांचा आकडा 16 हजार 180 इतका झाला आहे.
पुण्यात काय आहे स्थिती?
पुणे शहरात रविवारी नव्याने 106 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 5 लाख 3 हजार 175 इतकी झाली आहे. शहरातील १२६ कोरोनाबाधितांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला असून, पुणे शहरातील एकूण कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या 4 लाख 93 हजार 55 झाली आहे.
पुणे शहरात रविवारी एकाच दिवसात 5 हजार 488 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण चाचण्यांची संख्या आता 34 लाख 79 हजार 396 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 56 रुग्णांपैकी 166 रुग्ण गंभीर, तर 221 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर पुणे महापालिका हद्दीत दिवसभरात 2 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रविवारच्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 64 इतकी झाली आहे.
ADVERTISEMENT