मुंबईतल्या पावसामुळे 400 वाहनं मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये बुडाली आहेत. शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे मुंबईतील कांदिवली भागात जे मुंबई महापालिकेचं पे अँड पार्क आहे तिथे 400 वाहनं पाण्याखाली गेली आहेत. शनिवारपासून पाऊस चांगलाच कोसळतो आहे. आणखी पाच दिवस तरी असाच पाऊस कोसळणार अशी चिन्हं आहेत. शनिवारी रात्री जो पाऊस झाला त्यामुळे मुंबईतल्या कांदिवली भागात असलेल्या महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली. या ठिकाणी बेसमेंटमधली पाण्याची पातळी इतकी वाढली की 400 वाहनं बुडाली आहेत.
ADVERTISEMENT
हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर साठलं होतं की मुंबई महापालिका आणि अग्नीशमन दलाला हे पाणी काढण्यासाठी मोठे वॉटर पंप लावून हे पाणी काढावं लागलं. हे पाणी काढत असताना एक मोठी भीती अशी होती की या पाण्यात कुणी अडकलं तर नाही ना? वाहनांभोवती साठलेलं पाणी काढत असताना त्यांनी प्रत्येक वाहन तपासलं की त्यात कुणी अडकलं नाही ना? याची त्यांनी खात्री करून घेतली.
मुंबई महापालिकेचं हे पार्किंग कांदिवली पूर्व भागात आहे. 500 वाहनं पार्क होऊ शकतात एवढी या पार्किंगची क्षमता आहे. यामध्ये कार, ऑटो रिक्षा, ओला, उबर टॅक्सी अशा वाहनांचा समावेश आहे. पाण्याखाली गेलेल्या बीएमसीच्या या पे अँड पार्किंगमध्ये मोठ्यासंख्येने वाहनं लावण्यात आली होती. मात्र सध्या हा भाग पूर्णत: पाण्याखाली गेलेला असल्याने, त्या ठिकाणी असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाकडून या ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. वाहन चालकांकडून बीएमसीकडे नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. तर, भाजपा व मनसेच्या स्थानिक नेते मंडळींनी देखील हा मुद्दा उचलून धरला असून, बीएमसीने वाहनांच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी असे म्हटले आहे.
अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना घर सोडावं लागल्याचंही समोर आलं आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये तर दुचाकी वाहनं रस्त्यावरील पाण्यात वाहून जाताना दिसली. अशाचप्रकारे कांदिवली भागातील ठाकूर कॉम्प्लेक्समधील मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये पावसाचं पाणी मोठ्याप्रमाणावर साचल्याचं समोर आलं आहे. शिवाय जवळपास 400 वाहनं या पाण्याखाली गेली असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
लोक आता याबाबत महापालिकेला दोष देत आहेत. या ठिकाणी वाहन लावणारे कमलेश सिंग म्हणतात, गेल्या पाच वर्षांपासून मी इथे गाडी पार्क करतो. मी वाहन पार्क करण्यासाठीचं शुल्कही भरतो. जेव्हा या ठिकाणी पाणी भरण्यास सुरूवात झाली तेव्हा महापालिकेने वाहनं बाहेर काढायला हवी होती. आता आमचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई महापालिकेने द्यावी. माझी कार मी रिपेअर केली आहे पण माझं नुकसान कोण भरून देणार? असेच प्रश्न इतर वाहनचालकांनी आणि मालकांनीही विचारले आहेत.
ADVERTISEMENT