नागपूर: महाराष्ट्रात नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (15 डिसेंबर) पार पडला. ज्यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी तुलनेने तरुण असं मंत्रिमंडळ पाहायला मिळालं. तर महायुतीमधील तीनही पक्षातील प्रमुखांनी आपल्या दिग्गज नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. दरम्यान, राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, नेमकं मंत्रिमंडळात कोण-कोण असावं हे भाजपनेच ठरवलं आहे.
ADVERTISEMENT
म्हणजेच, भाजपने ज्या नेत्यांना हिरवा झेंडा दाखवला त्यांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या काही दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देता आली नाही.
हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion LIVE: फडणवीसांचं जम्बो मंत्रिमंडळ, महायुतीच्या 39 मंत्र्यांनी घेतली शपथ
एक नजर टाकूया कोणत्या पक्षाने कोणाचा पत्ता कापला...
भाजपने 'या' मंत्र्यांचा पत्ता केला कट
- सुरेश खाडे
- विजयकुमार गावित
- रवींद्र चव्हाण
- सुधीर मुनगंटीवार
भाजपने चार दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. ज्यापैकी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव नसणं हे अनेकांसाठी धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे. कारण सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील भाजपमधील बडं प्रस्थ मानलं जात होतं. मात्र, त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान न देऊन फडणवीसांनी सूचक असा संदेशही दिला आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion : थाटात पार पडला शपथविधी सोहळा! कोणत्या विभागाला किती मंत्रिपदं?
दुसरीकडे फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. पण त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने 'या' मंत्र्याचा पत्ता केला कट
- दिलीप वळसे पाटील
- छगन भुजबळ
- अनिल पाटील
- संजय बनसोडे
- धर्मरावबाबा अत्राम
दुसरीकडे दिग्गज नेत्यांचा पत्ता कापण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल ठरलं आहे. त्यांनी आपल्या 5 दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. ज्यामध्ये छगन भुजबळ, वळसे-पाटील यांचा समावेश आहे.
शिवसेनेने 'या' मंत्र्यांचा पत्ता केला कट
- तानाजी सावंत
- अब्दुल सत्तार
- दीपक केसरकर
तर शिवसेनेच्या तीन दिग्गज नेत्यांचा पत्ताही यावेळी कापण्यात आला आहे. ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर अत्यंत आक्रमक भूमिका घेणाऱ्या तानाजी सावंत यांना मात्र आता मंत्रिमंडळात स्थान नाकारण्यात आलं आहे. तर त्यांच्यासोबत अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकरांनाही बाहेरच ठेवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT