पुण्यामध्ये 22 वर्षाची पूजा चव्हाणने रविवारी 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 च्या सुमारास पहिल्या मजल्यावरुन उडी मारली आणि आत्महत्या केली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच पूजाचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. पूजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आणि प्रेमसंबंधातूनच पूजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही.
ADVERTISEMENT
पूजाच्या आत्महत्येनंतर आता अनेक प्रश्न निर्माण होत असून एकूण या आत्महत्या प्रकरणाबद्दल अनेक अंदाज व्य़क्त केले जात आहेत.
1. पूजा चव्हाणच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकी काय माहिती?
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला असून या अहवालानुसार पूजाचा मृत्यू हा डोक्याला मार लागल्यामुळे तसेच पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळते. पूजा प्रेग्नंट होती, तिने मद्य प्राशन केले होते अशी चर्चा सुरु होती पण अशी कुठलीही माहीती पूजाच्या अधिकृत शवविच्छेदन अहवालात नाही. तसंच तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे त्याची अहवाल येणे अद्याप बाकी आहे. कदाचित व्हिसेरामधून अन्य काही बाबींचा उलगडा होऊ शकतो.
2. पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली नाही?
पूजा चव्हाण आत्महत्येला 8 दिवस उलटून गेले असले तरी या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांनी अजून तरी कोणतीही पत्रकार परिषद घेतलेली नाही आणि कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. कदाचित यामुऴे पुणे पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
3. पूजा चव्हाणचा मोबाईल लॅपटॉप कुठे आहे ?
आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाणचा मोबाईल आणि लॅपटॉप नेमका कोणाकडे आहे य़ाबाबत अद्याप काहीही माहिती पुणे पोलिसांनी दिलेली नाही. भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीसांनी मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांकडे असल्याचे सांगितले होते पण पुणे पोलिसांकडून या माहितीली दुजोरा देण्यात आलेला नाही.
4. पूजा चव्हाण प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल कशा झाल्या?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर काही ऑडिओ क्लिप्स सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. या क्लिप्स व्हायरल कशा झाल्या हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मुंबई तकच्या सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित क्लिप या अरुण राठोड नावाच्या व्यक्तीनेच स्थानिक भाजप नेत्याला दिल्या आणि या भाजप नेत्याकडूनच या ऑडिओ क्लिप सगळीकडे फिरवण्यात आल्या.
5. घर मालकाने अरुण राठोडला घर रिकामं करायला का सांगितलं?
पूजा चव्हाणने ज्या घरात आत्महत्या केली ते घर अरुण राठोडच्या नावावर होते. अरुण राठोडने विनय गायकवाड यांच्याशी 11 महिन्यांचा करारहीव केला होता. पण घरमालक विनय गाय़कवाड यांनी अरुण राठोड हा कोणत्या मुलीसोबत घरात राहतो याची माहिती नव्हती. त्यांना 30 जानेवारीला ही माहिती मिळताच विनय गायकवाड यांनी अरुण राठोडला घर रिकाम करण्यास सांगितले. सुरुवातीला अरुण राठोड याने पूजा चव्हाण हा आपली बहीण असल्याचे सांगितले होते. पण नंतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अरुण राठोड हा खोटं बोलत असल्याचे घरमालकाच्या लक्षात आले आणि त्यांनी अरुणला घर रिकाम करण्यास सांगितले.
6. पूजा चव्हाण पुण्यात नेमकी कशासाठी आली होती?
पूजा चव्हाण नेमकी पुण्यात कशासाठी आली होती याबद्दलसुध्दा उलटसुलट माहिती मिळत आहे. पूजाच्या आज्जीच्या माहितीनुसार पूजाला कोणीतरी पुण्याला बोलवले होते तर काहींच्या म्हणण्यानुसार पूजा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती.
7. पूजा चव्हाण आत्महत्या करणार याची आधीच कल्पना होती का?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या त्या कथित संभाषणात अरुण नावाची व्यक्ती कथित मंत्र्याला पूजाच्या डोक्यात आत्महत्येचा विचार करत असल्याचे सांगत होती. पूजाला समजावा, तिला समजावून सांगा असेही अरुण संबंधित मंत्र्याला सांगत असल्याचे ऐकायला मिळते. त्यानंतर पूजाने आत्महत्या केली.
ADVERTISEMENT