कल्याणमध्ये ९ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या, नराधमाकडून बकरीवरही अत्याचाराचा प्रयत्न

मुंबई तक

15 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:20 AM)

कल्याण : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना पंधरा दिवसापूर्वी महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. महात्मा फुले पोलिसांनी या घटनेचा शोध लावला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीला यापूर्वी देखील बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृहातून सुटून आलेल्या या आरोपीने पुन्हा तेच […]

Mumbaitak
follow google news

कल्याण : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना पंधरा दिवसापूर्वी महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. महात्मा फुले पोलिसांनी या घटनेचा शोध लावला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीला यापूर्वी देखील बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृहातून सुटून आलेल्या या आरोपीने पुन्हा तेच कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

आरोपी मूळचा मध्यप्रदेशचा, भिवंडीत वास्तव्यास

मूळचा मध्यप्रदेश येथे असणारा सुरज सिंग उर्फ वीरेंद्र शंकर मिश्रा (32) हा आरोपी भिवंडी शहरात राहत होता. अटक आरोपीकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्याला यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या बालकांचे लैंगीक अत्याचाराचे गुन्हयामध्ये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सूरज उर्फ विरेंद्रची १४ नोव्हेंबरला तुरूंगातून सुटका झाली होती. त्यानंतर नव्याने आयुष्य सुरू करायचे सोडून फिरस्ता असणाऱ्या विरेंद्रची नजर कल्याण येथील महात्मा फुले परिसरातील एका इमारतीच्या खालील फुटपाथवर झोपणाऱ्या ९ वर्षांच्या चिमुरडीवर पडली. मुलगी आपल्या आई, वडिलांसोबत आभा बिल्डींग समोरील फुटपाथवर येथे झोपली होती. आरोपीत याने मुलगी झोपेत असतांना तिला पळवुन नेवुन बाजुलाच असलेल्या सोसायटीच्या आवारातील मागील बाजुस नेवुन तिचेवर गंभीर स्वरुपाचा लैंगिक अत्याचार करुन, तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिची निर्घृण हत्या केली.

तपासाचा वेग वाढवून पोलिसांची कारवाई

या प्रकरणाची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी धाव घेत जागेची पाहणी करत तपासाला सुरुवात केली. मयत मुलीचे शवविच्छेदन बाई रुक्मिणीबाई हॉस्पीटल येथील न्यायवैधक तज्ञ डॉ. कुणाल शिरसाठ यांचेकडुन करुन घेण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. मात्र तपासाचा वेग वाढल्यानंतर हे कृत्य करणारा तरुण वेगळा असल्याचे त्यांचा लक्षात आले. याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे भा.दं.वि. कलम ३०२, ३६३, ३७६ अब, सह पोक्सो अधिनियम २०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर आणि अत्यंत संवेदनशील स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांर्भीय लक्षात घेवुन पोलीस आयुक्त यांनी ठाणे शहर अंतर्गत असलेल्या सर्व गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन स्तरावर सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोपीचा शोध घेण्यासाठी महात्मा फुले पोलिसांनी विविध दहा पथकं तयार केली होती.

पोलिसांची दहा पथकं करण्यात आली होती तैनात

त्याप्रमाणे तपास पथकांनी सीएसटी ते कर्जत, कल्याण ते कसारा रेल्वे स्थानके, व सदर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परीसर, कल्याण पुर्व व पश्चिम, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पूर्व व पश्चिम, कर्जत, शहाड, आंबिवली, टिटवाळा, बनेली झोपडपट्टी, कळवा झोपडपट्टी, मुंब्रा पुर्व व पश्चिम परिसरातील झोपडपट्टी, डोंबिवली, भिवंडी या परीसरात अहोरात्र मेहनत घेवुन सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज तपासुन संशयीत आरोपीचा फोटो आणि फुटेज प्राप्त करुन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तसेच अभिलेखावरील गुन्हेगार, रेल्वेच्या अभिलेखावरील गुन्हेगार, जेलमधुन सुटलेले गुन्हेगार यांची माहीती मागवुन त्याद्वारे आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला.

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे एक पथक जि.रिवा, मध्यप्रदेश येथे आरोपीचे मुळ गावी पाठविण्यात आले होते. सदर आरोपी याचा त्याचे मूळ गाव तसेच भिवंडी परीसरात राहण्याचे आणि लपण्याचे ठिकाण या ठिकाणी एकाच वेळी शोध मोहीम राबवुन त्यास सोनाळे गाव, ता. भिवंडी या ठिकाणी शिताफीने ताब्यात घेतल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

विशेष म्हणजे या सोनाळे परिसरातील बकरीच्या गोठ्यात जाऊन अंधाराचा फायदा घेत त्याने बकरीवर देखील अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच विरेंद्रने त्याच्या विकृतपणाचा कळस गाठल्याचे समोर आले आहे.

सदर गुन्ह्यात कोणताही पुरावा नसतांना केवळ सी.सी.टी.व्ही. फुटेजचे सलग १४ दिवस अहोरात्र पाहणी करुन, तांत्रीक तपास तसेच गोपनिय बातमीदार व वेगवेगळया पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील आरोपींची माहिती संकलित करून विकृत मानसिकता असलेल्या आरोपीस निष्पन्न करुन त्याला शिताफीने अटक करून अत्यंत संवेदनशिल गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीला रिमांडकरीता कल्याण न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीची 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. गुन्हयाचा तपास वपोनि अशोक होनमाने हे करीत आहेत. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाणाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली असून अधिक तपास करत आहेत

    follow whatsapp