अहमदनगरच्या संगमनेरमध्ये राज्य राखीव दलाच्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. 100 जणांच्या जमावाने पोलिसांवर हा हल्ला केला. पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. संगमनेरच्या तीन बत्ती चौकात ही घटना घडली. पोलीस कर्मचारी सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जुबेर हॉटेलचा मालक, तिथले सगळे कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ शेख, अरबाज शेख यांच्यासह अनोळखी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
दंगलीसह सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतले बरेचसे आरोपी पळून गेले आहेत. त्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत. शहरातील या चौकात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात आहे. या ठिकाणी गर्दी झाल्याने ती पांगवण्यासाठी पोलीस गेले होते. सुरूवातीला जमावासोबत त्यांची बाचाबाची झाली. पोलिसांना जमावातील काही जणांनी धक्काबुक्कीही केली. गर्दी केलेल्या अनेकांनी मास्क लावले नव्हते तसंच सोशल डिस्टन्सिंगही हे लोक पाळत नव्हते. त्यातून ही घटना घडली आहे. जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. तसंच एका चौकात उभा करण्यात आलेला पोलिसांचा तंबूही उखडून फेकण्यात आला. या हल्ल्यात काही खासगी वाहनांचेही नुकसान झाले आहे.
पोलीस अधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह अतिरिक्त पोलीस तिथे आले तेव्हा काही काळ संगमनेरमध्ये तणाव निर्माण झाला होता.
अजित पवारांनी काय म्हटलं आहे?
संगमनेरच्या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. लोक गेल्या वर्षीही लॉकडाऊनचा त्रास सहन करत होते आणि आत्ताही लॉकडाऊन आहे. एवढा मोठा महाराष्ट्र आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले त्या रागातून कुठेतरी ही अशी घटना घडली असावी. तरीही परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे. पोलीस जे लोकांना समजावून सांगत होते ते त्यांच्या भल्यासाठीच होतं. पोलिसांचं म्हणणं लोकांनी ऐकायला हवं होतं. पण तसं घडलं नाही. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी आम्ही काळजी घेऊन असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT