राजस्थानमधील जोधपूर जेलमध्ये असलेल्या आसाराम बापू यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांच्यावर सध्या महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जेलमध्ये असताना आसाराम बापू यांना अस्वस्थ वाटत होतं, यानंतर लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू जोधपूर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
ADVERTISEMENT
अस्वस्थ वाटायला लागल्यानंतर आसाराम बापूंनी पहिल्यांदा जेलच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक उपचार केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बापूंना महात्मा गांधी रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डात हलवण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर आसाराम बापू यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत.
आसाराम बापूंची तब्येत बिघडल्याची बातमी बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली होती. लैंगिक शोषणावरील आरोपांवरुन आसाराम बापूंच्या याचिकेवर जोधपूर हायकोर्टात सुनावणी होणार होती. परंतू आसाराम यांच्या वकीलांना मुंबईत एका कामानिमीत्त यावं लागणार होतं, ज्यासाठी त्यांनी कोर्टाला ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. यानंतर कोर्टाने ८ मार्च रोजी सुनावणीची तारीख निश्चीत केली आहे.
२०१३ साली एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूंवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. ज्यानंतर ३१ ऑगस्ट २०१३ मध्ये आसाराम यांना इंदूरमधून अटक करण्यात आली होती. आसाराम बापूंवर पोस्को, ज्युविनाएल जस्टीस, बलात्कार आणि अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. २०१४ मध्ये आसाराम बापूंनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला परंतू सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला. २०१८ मध्ये जोधपूर येथील स्पेशल कोर्टाने आसाराम बापूंना लैंगिक शोषणातील आरोपांमध्ये दोषी ठरवून आजन्म कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
ADVERTISEMENT