दसरा मेळाव्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर!

मुंबई तक

• 03:37 PM • 29 Sep 2022

महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचंच नाही, तर सर्वसामान्यांचंही लक्ष सध्या शिवसेनेतल्या घडामोडींकडे लागलेलं असतं. शिंदेंनी बंड केलं. आमदार खासदार फोडले, पण पुन्हा शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार का? असाही प्रश्न विचारला जातोय. यावर एकनाथ शिंदेंकडून नकारात्मक भूमिका मांडली गेली असली, तरी शिंदे गटाकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ऑफर देण्यात आलीये. शिंदे गटातल्या अब्दुल सत्तारांनी याबद्दल एक विधान […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचंच नाही, तर सर्वसामान्यांचंही लक्ष सध्या शिवसेनेतल्या घडामोडींकडे लागलेलं असतं. शिंदेंनी बंड केलं. आमदार खासदार फोडले, पण पुन्हा शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार का? असाही प्रश्न विचारला जातोय. यावर एकनाथ शिंदेंकडून नकारात्मक भूमिका मांडली गेली असली, तरी शिंदे गटाकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ऑफर देण्यात आलीये. शिंदे गटातल्या अब्दुल सत्तारांनी याबद्दल एक विधान केलंय.

हे वाचलं का?

शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे मंत्री झाले. आता शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ताकद लावलीये. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याचे मार्ग होत चाललेत का असं बोललं जातंय. पण आता अब्दुल सत्तारांनी केलेल्या विधानाने शिंदे-ठाकरे एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता निर्माण झालीये.

अब्दुल सत्तार उद्धव ठाकरेबद्दल नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रा आणि शिव संवाद यात्रेला उत्तर म्हणून शिंदे गटाने हिंदू गर्व गर्जना यात्रा सुरू केलीये. या यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात शिंदे गटाकडून मेळावे घेतले जाताहेत. जालन्यात शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळावा झाला. या मेळाव्यात अब्दुल सत्तार म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं. एकनाथ शिंदेंसोबत जुळवून घेतलं नाही, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल”, असं यांनी म्हटलंय.

शिंदे गट दसरा मेळाव्यात दाखवणार ताकद! मेळाव्यासाठी नेत्यांना काय दिलं गेलं टार्गेट?

अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा अर्थ काय?

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये प्रचंड दुरावा आलाय. उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं नाव न घेताच टीका केली जातेय. तर एकनाथ शिंदेंही उद्धव ठाकरेंचं नाव घ्यायचं टाळतात. त्यामुळे दोघांमध्ये निर्माण झालेली दरी मिटणार का? असाही मुद्दा चर्चेत येतो. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबद्दल शिंदे गटाची भूमिका काय आहे, हेही महत्त्वाचं होतं. अब्दुल सत्तारांच्या विधानानं आता शिंदे गट एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल अनुकूल असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वीही दीपक केसरकर यांनीही अशाच आशयाचं विधान केलेलं होतं. मात्र, आता शिवसेनेतल्या नेत्यांची आणि उद्धव ठाकरेंची भूमिका काय अद्याप तरी स्पष्ट झालेली नाही.

शिंदेंचं पारडं जड की ठाकरेंचं? तीन निकषांवर ठरणार खरी शिवसेना कुणाची, नियम काय सांगतो?

शिंदे-ठाकरे एकत्र येण्याची शक्यता?

शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याबद्दल शिवसेनेत काही प्रमाणात एकमत असलं, तरी ती शक्यता सध्या धुसर दिसतेय. कारण आजच्या घडीला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारायला तयार नाहीत, असंच दिसतंय. ते एकनाथ शिदेंच्या आतापर्यंतच्या भूमिकांमधून दिसून आलंय. इतकंच नाही, तर एका मुलाखतीतही एकनाथ शिंदेंनी ठाकरे-शिंदे एकत्र येण्याबद्दल नकारात्मकच भूमिका मांडलेली आहे. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे शिंदे गटाचं म्हणणं आहे की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून भाजपसोबतच राहावं, अशी प्रमुख मागणी शिंदे गटाची आहे. शिंदे गटाच्या या मागणीलाच ठाकरेंचा विरोध आहे. त्यामुळे सध्यातरी एकत्र येण्याची शक्यता कमी दिसतेय.

    follow whatsapp