Abu Azmi निलंबित, पण राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांचं काय? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?

Abu Azmi Suspended: अबू आझमी यांना सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांचं काय असाही एक सवाल उपस्थित होतोय. यावरुन सभागृहात मोठी खडाजंगी झाली.

Mumbai Tak

सुधीर काकडे

06 Mar 2025 (अपडेटेड: 06 Mar 2025, 11:42 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई

point

फडणवीस म्हणाले, आझमींना 100 टक्के तुरूंगात टाकू

point

विरोधकांनी विचारलं, सोलापूरकर, कोरटकरचं काय?

Abu Azmi Suspended:औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या विधानामुळे वादात सापडलेले मुंबईतील मानखुर्द-शिवाजी नगर येथील समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. विरोधकांच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस  विधान परिषदेत म्हणाले, अबू आझमींना 100 टक्के तुरुंगात पाठवलं जाईल. अबू आझमी यांना सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांचं काय असाही एक सवाल उपस्थित होतोय.

हे वाचलं का?

अबू आझमी निलंबित...

सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत आग्रह धरला की, औरंगजेबाची स्तुती करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान आहे, दोन्ही छत्रपती महाराष्ट्रासाठी आदरणीय आणि पूजनीय आहेत. त्यामुळे आझमींना निलंबित करावं. त्यानंतर अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि 26 मार्च म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्यात आलं. त्यावर अबू असीम आझमी यांनी या कारवाईचा निषेध करताना, वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतरही त्यांना शिक्षा झाली असं म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "गद्दारांनो 'छावा' बघा..", उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर डागली तोफ, अबू आझमी, नीलम गोऱ्हेंनाही सुनावलं

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानपरिषदेत विचारलं की, अबू आझमी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल तुरुंगात का पाठवलं नाही? तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अबू आझमींना 100 टक्के तुरुंगात टाकलं जाईल. अबू आझमी असोत किंवा इतर कोणीही, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. गरज पडली तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ."

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रीय प्रतीकं आणि महापुरुषांविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीही करू नये आणि त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं ही सरकारची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे यांनी अबू आझमी यांना विधानसभेतून कायमचं निलंबित करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे अबू आझमी यांनी एक व्हिडिओ जारी करून म्हटलं की, 'मी काहीही चुकीचं बोललो नाही, पण सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी मी विधानसभेबाहेर केलेलं माझं भाष्य मागे घेतलं. तरीही, मला विधानसभेतून निलंबित करण्यात आलं.

सोलापूरकरला संरक्षण, कोरटकर फरार...

विरोधकांवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत म्हटलं होतं की, शिवराय औरंगजेबापेक्षा लहान होते आणि औरंगजेब प्रचंड आणि महान होता, असं म्हटलं. आव्हाड यांना कोणी विरोध केला का? टीका करताना तुम्ही अशी ठराविक भूमिका घेऊ शकत नाही. प्रशांत कोरटकर वगैरे लोक चिल्लर आहेत, पण नेहरूंच्या 'द डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकातही छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी आहे. विरोधी पक्ष याविरुद्ध बोलेल का? नेहरूंचा निषेध करण्याची हिंमत त्यांच्यात आहे का?" असा सवाल फडणवीस यांनी केला होता.

हे ही वाचा >> Abu Azmi Suspended : औरंगजेबाचं कौतुक, आयशा टाकियाचे सासरे निलंबित, कोण आहेत अबू आझमी?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर या अभिनेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता. त्यावेळी राहुल सोलापूरकर वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, सरकारने त्यांना संरक्षण दिलं असून, त्याच्यावर कुठलीही कठोर कारवाई झाली नाही. तसंच दुसरीकडे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना शिवरायांबद्दल चुकीचं वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर हा सुद्धा फरार आहे. अबू आझमींचा निषेध, कारवाई व्हावी, पण छत्रपतींचा अपमान करणारे कोरटकर, सोलापूरकर अजून मोकाट कसे? दोघांना वेगळा न्याय कसा? सवालही काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला.

औरंगजेबाचं कौतुक करताना आझमी काय म्हणाले होते?

औरंगजेबाचे कौतुक करताना आझमी म्हणाले होते की, मुघल सम्राटाच्या कारकिर्दीत भारताच्या सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा (म्यानमार) पर्यंत पोहोचल्या होत्या. औरंगजेबाच्या कारकिर्दीत आपला जीडीपी 24 टक्के होता आणि भारताला सोन्याची चिडीया म्हटलं जायचं. औरंगजेब आणि मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील युद्धाबद्दल विचारलं असता, आझमी यांनी ही लढाई राजकीय लढाई होती असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मोठा गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आझमी यांना निलंबित करण्याची आणि त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल चालवण्याची मागणी केली आहे.

राहुल सोलापूरकर काय म्हणाला होता? 

'आपल्याकडे दुर्दैवाने फक्त गोष्टींमध्ये अडकलेले आहोत.. शिवनेरीचा जन्म, मग काय नंतर पुण्याला आले.. गोष्टी रुपातच.. हे खरं नाहीच..' 'गमंत म्हणून सांगतो आता.. महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की, गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे. यामधून ती निर्माण ती कथा आहे की, जिने गडावरून उडी मारलेली.. हिरकणी घडलेलीच नाही. असा काही नाहीए. मी रायगडावर फिल्म केली आहे. असं काही नाहीए. असा इतिहासच नाही. पण लिहिलं गेलं.'

'किंवा महाराज आग्र्यावरून सुटले मिठाईचे पेठारे वैगरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज.. त्यासाठी किती हुंडा वटवलाय ते सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलीए महाराजांनी. मोहसीन खान की मोमीन खान नाव आहे त्याचं बहुतेक... त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवान्याने घेऊन सगळे बाहेर पडले आहेत.' 

'स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रुपात सांगताना मग ते लोकांना रंजक करून सांगावं लागतं. ती रंजकता आली की, इतिहासाला थोडासा छेद जातो.' असं विधान राहुल सोलापूरकरने एका पॉडकास्टमध्ये बोलताना केलं होतं.


    follow whatsapp