वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. या सिनेमाचं शुटिंग त्याने सुरू केलं आहे. या सिनेमातला छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक त्याने शेअर केला आहे. ज्यानंतर अक्षय कुमारवर तुफान टीका होते आहे. नेटकरी त्याला सुट्टी घेऊन घरी बसण्याचा सल्ला देत आहेत.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लुकमध्ये अक्षय कुमार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लुकमध्ये अक्षय कुमार या व्हीडिओत दिसतो आहे. डोक्यावर जिरेटोप, कपाळी टिळा, गळ्यात माळा, अंगरखा आणि पायजमा अशा छत्रपती शिवरायांच्या लुकमध्ये तो चालत येताना या व्हीडिओत दिसतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लुकमधला हा व्हीडिओ शेअर केल्यानंतर अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत.
काय म्हणत आहेत नेटकरी?
एक युजर म्हणतो “मला वाटतं या भूमिकेसाठी रणवीर सिंग जास्त योग्य होता.” एक युजर म्हणतो, “अक्षयने हा रोल स्वीकारून छत्रपती शिवाजी महाराजांची खिल्ली उडवली आहे” आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला की “छत्रपती शिवाजी महाराज कुपोषित नव्हते. त्यामुळे तू जरा वजन वाढव आणि मसल्स बनव” काही युजर्सनी अक्षय कुमारला सुट्टी घेऊन घरी बसण्याचाही सल्ला दिला आहे. एक युजर म्हणतो की हे सर्वात दुर्दैवी बाब आहे की अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये पाहावं लागणार आहे. या सिनेमासाठी थोडा अभ्यास करा आणि ४० दिवसात हा सिनेमा शूट करून संपवू नका असंही एका युजरने अक्षयला सुनावलं आहे.
वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची काही दिवसांपूर्वीच घोषणा
वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. या सिनेमात विशाल निकम, सत्य मांजरेकर, प्रवीण तरडे, जय दुधाणे यांच्यासह अनेकांच्या भूमिका आहेत. प्रतापराव गुजर या भूमिकेत प्रवीण तरडे झळकणार आहेत. या सिनेमाच्या मुहूर्ताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले होते. या सिनेमातले मावळ्यांचे लुकही त्यावेळी दाखवण्यात आले. ज्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावेळी अक्षय कुमार हा शर्ट आणि ट्राऊझरमध्ये आला होता. यावरही आक्षेप घेण्यात आला. आता अक्षय कुमारने या सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात केली असून फर्स्ट लुक शेअर केला आहे. लोकांनी मात्र त्याला सुट्टी घेऊन घरी बस असा खोचक सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT