राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट लिहिणाऱ्या केतकी चितळेला (Ketki Chitale) आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी केतकी चितळेने स्वतःच युक्तीवाद केला होता. केतकीला सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर केल्यानंतर तिच्या वादग्रस्त पोस्टचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने केतकीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. तिला आता न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
केतकीच्या अडचणींमध्ये भर
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आता मुंबई पोलीसही केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तसंच आता केतकी चितळेच्याबाबतीतही होण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात १५ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
केतकीने काय युक्तिवाद केला होता?
केतकीने कोर्टात युक्तीवाद करताना हे म्हटलं होतं की जी पोस्ट मी शेअर केली आहे, ती पोस्ट माझी नाही. सोशल मीडियातून कॉपी करून मी ती पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असाही प्रश्न केतकीने विचारला होता. एवढंच नाही तर मी पोस्ट डिलिट करणार नाही तो माझा अधिकार आहे असंही तिने कोर्टाला सांगितलं होतं.
अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर खासदार शरद पवार यांच्याबद्दल दि . १३ मे रोजी बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता . ज्यात संत तुकाराम यांचा देखील उल्लेख करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून केतकी चितळेविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे .
शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?
काय आहे प्रकरण?
केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिला अटकही करण्यात आली आहे.
पोस्टची पार्श्वभूमी काय?
मूळ पोस्ट अॅड. नितीन भावे या व्यक्तीची असून केतकीने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती.
या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.
ADVERTISEMENT