राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अपशब्द काढले. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. दुसरीकडे खोके सरकार ही जी टीका होते आहे ही देखील चुकीची आहे अशाही प्रतिक्रिया येत आहेत. अशात खोके सरकार या टीकेवरून आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना नोटीस पाठवणार असल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. याबाबत आता आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न विचारला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?
खोके म्हणजे नेमकं काय ? खोके म्हणल्यावर कशाला झोंबतं त्यांना ? हे त्यांनी जाहीर करावं. महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आणि ३३ देशांनी यांच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. या सगळ्यांना आधी नोटीस पाठवा कारण हे सरकार खोके सरकार म्हणून महाराष्ट्रात आणि जगभारत प्रसिद्ध झालं आहे त्यामुळे मला नोटीस पाठवत असाल तर हरकत नाही आधी या सगळ्यांना नोटीस पाठवा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज आदित्य ठाकरे हे सोलापूरमध्ये आहेत. तिथे त्यांना खोके सरकारवरून येणाऱ्या नोटीसबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
गद्दार सरकारमध्ये प्रत्येकाचा फक्त राजकारणावर फोकस
या गद्दार सरकारमध्ये प्रत्येकजण नुसतं राजकारणावर फोकस करत आहेत.घाणेरड्या राजकारणावर फोकस करतात. आपल्या राज्यातून उद्योग निघून गेले चार मोठे प्रकल्प निघून गेले.याकडे कुणाचंही लक्ष नाही.अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल झाले त्याच्यावर कोणाचे लक्ष नाही.पोलीस भरती पुढे ढकलली कोणतेही कारण दिले नाही.बेरोजगार तरुण रस्त्यावर फिरत आहेत. महिलांना शिवीगाळ होत आहे.तरी देखील कुठेही कारवाई होत नाही.एका बाजूला महाराष्ट्र मागे चाललेला आहे एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षासाठी. दुसऱ्या बाजूला गद्दार घाणेरडे राजकारण करत आहेत. त्यांना त्यांचे राजकारण करू द्या आम्ही जनतेची सेवा करू.
महाराष्ट्रात २१ जूनला शिवसेनेत उभी फूट पडली. कारण एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत थेट शिवसेना नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार राज्यात आलं. शिवसेनेत जेव्हा उभी फूट पडली तेव्हापासूनच आदित्य ठाकरे हे राज्याच्या विविध भागांमध्ये दौरा करत आहेत. आपल्या एकाही दौऱ्यात ते शिंदे सरकारवर टीकेची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.
ADVERTISEMENT