मुंबई : यापूर्वी 2 वेळा थंड बस्त्यात गेलेली भाजप-मनसे युती पुन्हा एकदा अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील महत्वाच्या भाजप नेत्यांच्या भेटीनंतर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही यांनीही आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटींनंतर युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. एक ठाकरे भाजपपासून दुरावल्यानंतर दुसऱ्या ठाकरेंना सोबत घेवून आगामी मुंबई आणि राज्यातील इतर महापालिका निवडणुकांमध्ये मराठी आणि हिंदू मतांची फूट टाळण्यासाठी म्हणून या संभाव्य युतीकडे पाहिले जात आहे.
ADVERTISEMENT
काल राज ठाकरे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जावून भेट घेतली असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. मात्र त्यानंतर अशी भेट झालीच नाही असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेतली फूट आणि मनसे-भाजपमध्ये संभाव्य युतीची वारंवार होणारी चर्चा या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीचे वृत्त आल्याने त्याची चर्चा झाली. पण दोन्ही नेत्यांनी अशी भेट झाल्याचा इन्कार केला. पाठोपाठ काल सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज ठाकरेंची मनसे आणि भाजप यांची युती शक्य आहे? समीकरण जुळल्यास कुणाचा कसा फायदा?
यापूर्वीही फडणवीस-राज ठाकरे आणि इतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. या सर्व भेटींपाठोपाठ आज चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सविस्तर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी ही भेट राजकीय असल्याचे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
राज आणि आमचे वैचारिक साम्य :
बावनकुळे म्हणाले, आपण राज ठाकरे यांची केवळ सदिच्चा भेट घेतली. शिवाय उद्यापासून गणेशोत्सवदेखील आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे असून, ते नेहमी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. राज आणि आमचे वैचारिक साम्य आहे. ते नेहमी हिंदुत्वाची बाजू मांडून रक्षण करत आले आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणे गैर नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी :
यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे. त्यांनी सर्वकाही सोडून दिले असून कौटुंबिक प्रेमात सगळे विसरले आहेत. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला बगल देऊन ते आपले कार्य करत आहेत. सध्या त्यांचे जे काही सुरू आहे त्यावरुन ते गडबडलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका कोणती हे कळत नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
“राज आणि आमचे वैचारिक साम्य” : भाजप मनसे युतीचे बावनकुळेंचे संकेत
युतीचा निर्णय केंद्रातून :
भाजप-मनसे युती होणार का? या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी युतीचा निर्णय केंद्रातील वरिष्ठ नेते अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस घेतात. माझे, काम केवळ पक्ष कसा वाढेल आणि त्यासाठी काय काय करता येईल हे करणे आहे. त्यामुळे युती करणे, भविष्यात काय रणनीती असणार याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT