नवी दिल्ली: ट्विटर आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील संघर्ष सतत वाढत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे अकाउंट काही दिवसांपूर्वी लॉक करण्यात आले होते. त्या पाठोपाठ इतर काही नेत्यांचे अकाउंट देखील लॉक केले गेले. असं असताना आता काँग्रेस पक्षाचे ट्विटर (Twitter) अकाउंट देखील लॉक करण्यात आले आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, ‘त्याचे, ट्विटर अकाउंट लॉक केले गेले आहे. परंतु आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू.’
ADVERTISEMENT
काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर (Facebook) ही माहिती दिली आहे. काँग्रेसने यावेळी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘जेव्हा आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा आम्ही घाबरलो नाही मग आता ट्विटर अकाउंट बंद केल्याने आम्ही घाबरु असं वाटत असेल तर तसं अजिबात होणार नाही. आम्ही काँग्रेस आहोत, जनतेचा संदेश आहे, आम्ही लढू, आम्ही लढत राहू.’
यावेळी काँग्रेसकडून असे म्हटले गेले आहे की, बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणे हा गुन्हा असेल, तर आम्ही हा गुन्हा शंभर वेळा करू. जय हिंद, सत्यमेव जयते.
दिल्लीत एका नऊ वर्षांच्या मुलीवर कथित बलात्कार आणि हत्येनंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी तिच्या कुटुंबाला भेटले होते. या भेटीचे फोटो राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केले होते. ज्यानंतर, राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट पहिले स्पपेंड करण्यात आलं होतं आणि नंतर ते लॉक करण्यात आलं होतं.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त रणदीप सुरजेवाला, अजय माकन, सुष्मिता देव यांच्यासह इतर अनेक काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आले होते.
या मुद्द्यावरून सरकारला सतत काँग्रेसकडून घेरले जात आहे. काँग्रेसने असाही आरोप केला आहे की, सरकारच्या दबावाखाली ट्विटरद्वारे अशी कारवाई केली आहे. अलीकडेच युवक काँग्रेसनेही दिल्लीतील ट्विटर कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती.
Rahul Gandhi : राहुल गांधींवर ट्विटरकडून कारवाई; ‘त्या’ ट्विटमुळे अकाऊंट केलं lock
दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाउंट लॉक होण्याबाबत ‘आज तक’शी बातचीत केली. यावेळी केंद्रीय मंत्री म्हणाले की, ‘जेव्हा भाजप नेत्यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले जात होते तेव्हा, ट्विटरचे प्रवक्ते कोण होते. हेच काँग्रेसचे मोठे नेते त्यांचे प्रवक्ते बनून त्यांची बाजू मांडत असायचे.’
नकवी पुढे असंही म्हणाले की, ‘ते मोठ्या भ्रष्टाचाराचे क्रांतिकारी आहेत, आम्ही त्यांच्यावर काय बोलणार. अशा क्रांतिकारकांबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. जर त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई झाली तर ते क्रांतिकारक बनून हिंसा आणि अराजकता निर्माण करतील.’ असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवरच निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT