Sanjay Raut Vs Prakash Ambedkar :
ADVERTISEMENT
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नसताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. युतीचा घटक असलेल्या मित्र पक्षाच्या नेत्याविषयी बोलताना संजय राऊत यांनी तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असल्याचं सांगत आंबेडकर यांनी राऊतांना कानपिचक्या दिल्या.
संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सुरू असलेल्या वाक्युद्धाच्या त्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते रविवारी (२९ जानेवारी) पुण्यात बोलत होते. (After NCP and Sharad Pawar, Vanchit Bahujan Aghadi president Prakash Ambedkar has also targeted Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut)
आंबेडकर म्हणाले, एकमेकांना गुणदोषांसह स्वीकारलेला असताना राजधर्माचे पालन होण्याची गरज आहे. आगामी काळातील निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहेत का? याविषयी अजूनही संभ्रम आहे. त्यांनी सोबत यावं यासाठी उद्धव ठाकरे हेच बोलणी करतील. त्याबाबत आपण या पुढच्या काळात चर्चेपासून दूर राहणार असल्याचही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
Prakash Ambedkar : राष्ट्रवादी दुखावली, ‘मविआ’त ठिणगी! ठाकरेंसमोर संकट
आगामी काळात भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन अशा सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. सगळे एकत्र आल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आले नाही तर शिवसेना आणि वंचित मिळून १५० चा आकडा पार करेल असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस – संजय राऊत काय वाद आहे?
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षाचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019 च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं.”
प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा खासदार कसे झाले होते?
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबद्दल काय म्हणाले?
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शिवसेना आणि आमच्यामध्ये जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त आम्ही ते जाहीर करत नाही, कारण उद्धव ठाकरेंचा प्रयत्न चाललाय की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सुद्धा या आघाडीत यावी. त्यामुळे आम्ही हे सध्या जाहीर करत नाही. माझा कुणावर विश्वास आणि कुणावर विश्वास नाही, असं माझं नसतं. जुळायचं असेल, तर १०० टक्के जुळलं पाहिजे. बघायचं डावीकडे आणि हात टाकायचा उजवीकडे, अशी व्यवस्था असते ती मला चालत नाही”, म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली होती.
प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर संजय राऊत यांनी त्यांना बोलण्याबाबत सल्ला दिला होता. ‘मविआ’चा भाग व्हायचं असेल तर प्रमुख स्तंभांवर बोलू नये, असं राऊत यांनी म्हटलं होतं. ‘शरद पवार हे देशातल्या भाजपविरोधातल्या आघाडीच्या प्रयत्नातले प्रमुख स्तंभ आहेत. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झाली आहे. ते महाविकास आघाडीचे घटक होतील. त्यामुळे त्यांनी प्रमुख स्तंभांवर बोलू नये’ असा सल्ला संजय राऊतांनी दिला होता.
राऊत यांना उत्तर देतांना प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत? असा प्रश्न उपस्थित केला होता. ते माझ्या पक्षाचे नाहीत, मी माझ्या पक्षाचं ऐकेन त्यांचं का ऐकू? असं आंबेडकर म्हणाले होते. त्यावर पुन्हा संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. मी कोण आहे हे उद्धव ठाकरे ठरवतील. मीही वंचित बहुजन आघाडीचा नाही. म्हणून माझ्याविषयी ठाकरेच ठरवतील असं राऊत म्हणाले होते. राऊतांनी माझ्यासाठी हा विषय संपला असं जाहीर केलं होतं. पण आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT