मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या अडीच वर्षापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर होते. आज त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राजीनामा दिला आहे. भाषणादरम्यान त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे इतर नेते मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठकीसाठी उपस्थीत होते, त्यावेळी त्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष व्यक्त केला.
ADVERTISEMENT
मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्यासोबत ४० च्या वरती आमदार घेऊन एकनाथ शिंदे गोव्यामध्ये आहेत. उद्या महाराष्ट्र विधान भवनात फ्लोअर टेस्ट होणार होती परंतु त्याआधी राजीनामा दिल्याने फ्लोअर टेस्ट टळली आहे. आता महाराष्ट्रामध्ये पुढे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. पुन्हा कोण मुख्यमंत्री होणार, सत्तेच्या चाव्या कोणच्या हातात जाणार हे पाहावं लागणार आहे.
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यापासून भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत होती. परंतु काल भाजपने अधिकृत या नाट्यात उडी घेतली आणि राजभवन गाठले. राज्यापालांना एक पत्र देत त्यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे त्वरीत फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. त्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. पाच वाजल्यापासून चाललेल्या सुनावणीमध्ये निर्णय हा एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला.
ADVERTISEMENT