कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या औरंगाबाद शहरात आता लॉकडाउनवरुन नवीन संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री काहीही निर्णय घेऊदेत, १ तारखेला आम्ही औरंगाबादेत दुकानं उघडणार असं म्हणत थेट प्रशासनाला आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
“मुख्यमंत्री टीव्हीवर आले आणि त्यांनी सांगितली की आम्ही लॉकडाउन काळात कर्जाचे हप्ते, व्याज, लाईटबील या सर्व गोष्टी माफ करणार आहोत. या काळात आम्ही कर घेणार नाही असं जाहीर केलं तर आम्ही त्यांना नक्की पाठींबा देऊ. पण टीव्हीवर येऊन आम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आता ते ऐकणार नाही. बाकीच्या राज्यासाठी तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचाय तो घ्या १ जूनपासून औरंगाबादेत दुकानं उघडली जातील, प्रशासनाला जे करायचंय ते त्यांनी करावं.”
लॉकडाउन काळात औरंगाबादमध्ये एका ऑटोरिक्षाने आत्महत्या केली. ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी बँका, खासगी फायनान्स संस्थांचे गुंड लोकांना त्रास देतायत. या काळात त्यांनी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न विचारत जलील यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. औरंगाबाद शहरात लॉकडाउनचे नियम राबवताना भेदभाव होतोय. मोठ्या व्यापाऱ्यांची मिठाईची दुकानं सुरु ठेवून छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचंही जलील म्हणाले.
दुसरीकडे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्या भूमिकेला विरोध करत जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेल करत असल्याचं म्हटलंय. जर जलील दुकानं उघडायला आले तर शिवसैनिक त्याला उत्तर देतील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही जलील जर अशी भूमिका घेणार असतील तर प्रशासनाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी खैरे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT