मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवरती गंभीर आरोप केला आहे. आघाडी सरकारने वेदांता कंपनीकडे १० टक्के टक्केवारी मागितल्याचा आरोप शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याला आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. चौकशी करण्याचं खुलं आव्हान त्यांनी आशिष शेलारांना दिले आहे. ते आज बीडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT
अजित पवार काय म्हणाले?
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी अजित पवार उपस्थित होते. याअगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. ”दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार होती, त्यामध्ये हे सरकार कमी पडले आहे. दोन लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळणार होता. आता कंपनी तिकडे गेली तर सांगतात मागच्या सरकारने काय केलं?. महाराष्ट्रातील तरुणांनी पेटून उठलं पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
पुढे अजित पवार टक्केवारीच्या आरोपावरती म्हणाले ”याची चौकशी झाली पाहिजे, सरकार तुमचे आहे चौकशी करा. वेदांत प्रकल्प जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार आहे हे खोटं आहे. हे स्थगिती सरकार आहे, यापूर्वी कुठल्याही सरकारमध्ये अशी कामांची स्थगिती दिली नव्हती, आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राचा विकास होणार नाही, आम्हीही चुकीचं आरोप करणार नाही”.
आशिष शेलार यांनी काय आरोप केला?
आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवरती गंभीर आरोप केला आहे. ”गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10% लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा गौप्यस्फोट मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला!
वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? 10% नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे… जनतेसमोर सत्य यायलाच हवे!!” अशा आशयाचं ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
ADVERTISEMENT