चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या सराफावर कोठडीत लैंगिक अत्याचार, पीडित व्यक्तीच्या आरोपाने मोठी खळबळ

मुंबई तक

• 11:44 AM • 20 Jan 2022

– धनंजय साबळे, अकोला प्रतिनिधी पोलीस प्रशासनाकडे शहरातल्या आणि राज्यतली कायदा-सुव्यवस्था योग्य पद्धतीने सांभाळण्याची मोठी जबाबदारी असते. परंतू अनेकदा पोलीस कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करुन सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याचं समोर आलं आहे. अकोल्यातील एका सराफ व्यवसायिकाला पोलिसांच्या अशाच अमानुष वागणुकीचा प्रत्यय आला आहे. चोरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कोठडीत आपल्याला मारहाण […]

Mumbaitak
follow google news

– धनंजय साबळे, अकोला प्रतिनिधी

हे वाचलं का?

पोलीस प्रशासनाकडे शहरातल्या आणि राज्यतली कायदा-सुव्यवस्था योग्य पद्धतीने सांभाळण्याची मोठी जबाबदारी असते. परंतू अनेकदा पोलीस कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करुन सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याचं समोर आलं आहे. अकोल्यातील एका सराफ व्यवसायिकाला पोलिसांच्या अशाच अमानुष वागणुकीचा प्रत्यय आला आहे.

चोरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कोठडीत आपल्याला मारहाण करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित सराफ व्यवसायिकाने केला आहे. ज्यामुळे अकोल्यात पोलीस कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

पोलीस कोठडीत देण्यात आलेल्या थर्ड डिग्रीमुळे या सराफ व्यवसायिकाची मानसिक अवस्था खराब झाली आहे. आजही ते घरात दहशतीखाली वावरत आहेत. मुंबई तक ने या सराफ व्यवसायिकांची बाजू जाणून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, ९ जानेवारीच्या रात्री अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने पीडित सराफ व्यवसायिकाला सोनं चोरीच्या आरोपाखाली अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी नितीन चव्हाण आणि शक्ती कांबळे हे सराफ व्यवसायिकाच्या घरात शिरले आणि त्याच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत सराफाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

शेजाऱ्याला म्हणाले, ‘घरी मुलगी एकटीच आहे’; परत आल्यानंतर आईवडिलांना बसला धक्का

पोलीस कोठडीत गेल्यानंतर नितीन चव्हाण आणि शक्ती कांबळे या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्यावर अमानुष अत्याचार करायला सुरुवात केल्याचा आरोप या पीडित सराफ व्यवसायिकाने केला आहे. गाडीतून पोलीस ठाण्यात नेत असतानाही आपल्याला मारहाण करत तोंडावर थुंकल्याचा आरोप या सराफाने केला आहे. तसेच कोठडीत चौकशीदरम्यान सोनं चोरी प्रकरणातील इतर दोन आरोपींकडून सराफ व्यवसायिकावर लैंगिक अत्याचार करायला लावल्याचाही धक्कादायक गौप्यस्फोट पीडित सराफाने मुंबई तक शी बोलताना केला.

पोलीस कोठडीत आपल्यावरील अत्याचार इथेच थांबला नाही. मारहाण केल्यानंतर पाय सुजल्यामुळे दोन्ही पोलिसांनी त्यावर उकळतं पाणी टाकल्याचंही सराफ व्यवसायिकाने सांगितलं. तसेच कोर्टासमोर मारहाण झालेली नाही असं सांगण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत खोट्या सह्या घेतल्याचा आरोप सराफ व्यवसायिकाने केला आहे. मंगळवारी या सराफ व्यवसायिकाला कोर्टाने जामिन दिला. यानंतर सराफ व्यवसायिकाने अकोल्याचे पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्याकडे घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती देत तक्रार दाखल केली आहे.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधिक्षक श्रीधर यांनी शहर पोलीस उपाधिक्षक सुभाष दुधगांवकर यांच्याकडे प्रकरणाची चौकशी सोपवली आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत आरोप करण्यात आलेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन श्रीधर यांनी दिलं आहे.

सातारा : गर्भवती वनसंरक्षक महिलेला मारहाण, अवघ्या १२ तासांत माजी सरपंचाला अटक

परंतू घडलेल्या या प्रकारामुळे पीडित सराफ व्यवसायिकाचं कुटुंब घाबरुन गेलं आहे. या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी या कुटुंबाने केली आहे. कायद्याचे रक्षकच जर अशा प्रकारे वागणार असतील तर सामान्य जनतेच्या मनात पोलिसांविषयी चांगली भावना कशी तयार होईल असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे अकोला पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp