बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दोन गोष्टींमुळे चर्चेत आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर दुसरी गोष्ट म्हणजे याच मुद्द्यावरून त्याला ट्रोल केलं जातंय. अक्षय कुमाराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लुक प्रेक्षकांना आवडलेला नाही. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षयपेक्षा अभिनेता शरद केळकर भारी दिसतो, असा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासकालीन फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता अक्षय कुमार साकारणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लुक रिलीज करण्यात आलाय.
अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लुकचा फोटो आणि टीझर सोशल मीडियावरून शेअर केला. मात्र, त्यानंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लुक लोकांना आवडलेला नाही, असाच सूर समाजमाध्यमांवर उमटला आहे.
अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य पर्याय नसल्याचं सोशल मीडियावरून यूजर्स म्हणताहेत. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या इतर अभिनेत्यांच्या नावांची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
अक्षय कुमारने पोस्ट केला छत्रपती शिवरायांच्या लुकमधला व्हीडिओ, लोक म्हणाले सुट्टी घेऊन घरी बस
शरद केळकर आणि अक्षय कुमार यांच्यात तुलना
अक्षय कुमारचा वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लुक प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तुलना अभिनेता शरद केळकरने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेशी तुलना केली जात आहे.
अक्षय कुमार झळकणार मराठी सिनेमात, साकारणार छत्रपती शिवरायांची भूमिका
अनेकांनी शरद केळकरचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर अमोल कोल्हे, महेश मांजरेकर, चिन्मय मांडलेकर हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चांगले पर्याय आहेत, असंही नेटकरी म्हणताहेत.
#sharadkelkar हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये…
ट्विटरवर सध्या #sharadkelkar हा हॅशटॅग टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. अक्षय कुमारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो, व्हिडीओ आणि शरद केळकरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करून तुलना केली जात आहे. या भूमिकेसाठी शरद केळकर सर्वोत्तम पर्याय असल्याचं नेटकरी म्हणताहेत.
“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं असं वाटतं”; जितेंद्र आव्हाडही संतापले
“जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय… ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातयं असं वाटतं”, अशा शब्दात आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवाजी महाराजांच्या काळात लाईट कसे?
अक्षय कुमारने शेअर केलेल्या टीझरमध्ये लाईट्सचे झुंबर दिसत आहेत. त्यावरूनही लोकांकडून टीका केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विजेचा शोध लागलेला नव्हता, मग चित्रपटात लाईट्सचे झुंबर कसे? असा प्रश्न सोशल मीडियावरून उपस्थित केला जात आहेत.
ADVERTISEMENT