आर्यन खान आणि अनन्या पांडे या दोघांचे What’s App चॅट समोर आल्यानंतर दोन दिवस अनन्या पांडेचीही चौकशी NCB कडून करण्यात आली. पहिल्या दिवशी झालेल्या चौकशीत NCB ला काही धागेदोरे सापडले आहेत असं सांगण्यात आलं आहे, त्यामुळेच अनन्या पांडेला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. अनन्या पांडे तिचे वडील आणि अभिनेता चंकी पांडे यांच्यासोबत NCB कार्यालयात आली होती.
ADVERTISEMENT
सोमवारी अनन्याची पुन्हा होणार चौकशी
अनन्या पांडेची NCB ने आज चार तास आणि काल दोन तास अशी एकूण सहा तास चौकशी केली आहे. आता सोमवारी अनन्या पांडेला पुन्हा एकदा एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हजर व्हायचं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनन्या पांडेची चौकशी ड्रग्ज प्रकरणात केली जाते आहे. अनन्या पांडेच्या चौकशीमुळे आर्यन खानच्या अडचणी वाढू शकतात.
अनन्या पांडेसोबत चंकी पांडे NCB कार्यालयात गेला होता. मात्र त्याला समीर वानखेडे यांच्या कार्यालयाबाहेर बसवण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला अनन्या पांडेची चौकशी करण्यात आली.
आर्यन खान सेलिब्रिटी असण्याची किंमत चुकवतो आहे का? काय म्हणत आहेत कायदेतज्ज्ञ?
NCB ने अनन्या पांडेला काय प्रश्न विचारले?
1) आर्यन आणि तुझ्या चॅटवरून हे स्पष्ट होतं आहे की तुम्ही दोघंही ड्रग्ज खरेदी करण्याविषयी बोलत आहात, याआधी किती वेळा अशी चर्चा तुमच्यात झाली आहे?
2) व्हॉट्स अप चॅटमध्ये ज्या ड्रग्जचा उल्लेख आहे ते तुमच्यापर्यंत कुणी पोहचवलं?
3) कुठल्या ड्रग पेडलरला ओळखता का आणि थेट त्याच्याकडून ड्रग्ज घेतले होते का?
4) जेव्हा ड्रग्ज घेण्यात आलं तेव्हा ते किती प्रमाणात घेण्यात आलं खरेदी नेमक्या किती वजनाच्या ड्रग्जची झाली?
5) आर्यन आणि तू किती दिवसांपासून ड्रग्ज घेत आहात?
6) तुमच्यासोबत आणखी कुणी कुणी ड्रग्ज घेतले आहेत?
7) ड्रग पेडलरला पैसे कसे दिले जात होते?
8) पेडलरला डिजिटल पेमेंट? की कॅश देऊन ड्रग्ज खरेदी करायचात?
9) पेडलर, सप्लायरला तुम्ही नेमकं कुठे भेटला होतात?
10) ड्रग्ज खरेदी करण्यासाठी ज्या मित्राने मदत केली त्याचं नाव काय?
असे दहा प्रश्न अनन्या पांडेला चौकशीदरम्यान विचारण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
एनसीबीच्या हाती लागले अनन्याचे चॅट्स
आर्यन खानच्या फोनमध्ये एनसीबीला अनन्यासोबत केलेले तीन महत्त्वाचे चॅट्स आढळून आले आहेत. ही चर्चा 2018-2019 च्या कालावधीत झाली आहे. गांजा ओढण्याबाबत ही चर्चा झाली आहे. अनन्या पांडेचे दोन्ही फोन एनसीबीने जप्त केले आहेत. आज अनन्यांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला तेव्हा ती गोंधळून गेली होती. मला नीट काहीसं आठवत नाही असं उत्तर देत तिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्स अॅप चॅटमध्ये अनन्या आर्यनला हे सांगत होती की तिने आधी गांजा ओढून पाहिला आहे. तसंच तिला पुन्हा ट्राय करायचा आहे. आर्यन खान आणि अनन्यामध्ये जी चर्चा झाली त्यानुसार आर्यन आणि अनन्या गांजा ट्राय करण्याबद्दल बोलत होते. आर्यनने विचारलं की काही जुगाड होऊ शकतं का? त्यावर अनन्या म्हणाली की मी अरेंज करेन. हे चॅट्स जेव्हा एनसीबीने अनन्याला दाखवले तेव्हा ती म्हणाली की आमचं हे बोलणं गंमतीत सुरू होतं. एवढंच नाही तर या चॅटबाबत अनन्याला सातत्याने प्रश्न विचारले तेव्हा अनन्या पांडे हे म्हणाली की आर्यन सोबत मी सिगरेट ओढण्याबद्दल बोलले आहे. मात्र ड्रग्ज किंवा गांजा याबाबत आमच्यात काही चर्चा झाली नाही. तू ड्रग्ज घेतलं आहेस का या प्रश्नाला अनन्या पांडेने साफ नकार दिला. दरम्यान एनसीबीच्या हाती असा कोणताही पुरावा लागलेला नाही ज्यावरून हे म्हणता येईल की अनन्याने आर्यनसाठी ड्रग्ज अरेंज केले होते.
ADVERTISEMENT