Andheri By Poll : ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याचा पेच अखेर सुटला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई महापालिका आयुक्तांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करावा असे आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिले आहेत. ज्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे अनिल परब यांनी?
ऋतुजा लटके या विधवा झाल्या आहेत. रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांचा आधार हरपला आहे. अशी व्यक्ती जेव्हा पोटनिवडणुकीत उतरते त्यावेळी जे काही राजकारण केलं गेलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. उलट जेव्हा एखाद्या ठिकाणी उमेदवाराचा मृत्यू होतो त्यानंतर पोटनिवडणूक झाली तर ती बिनविरोध होते. ३ तारखेला राजीनामा दिल्यानंतरही ऋतुजा लटकेंवर १२ तारखेला भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं सांगण्यात आलं. हे राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललं आहे? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राचं राजकारण आजही खालच्या थराला गेलेलं नाही
महाराष्ट्राचं राजकारण आजही खालच्या थराला गेलंय असं मी म्हणणार नाही. पण जे काही चाललं आहे ते चांगलं चाललेलं नाही. एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि पोटनिवडणूक झाली तर घरचा सदस्य उभं असेल तर बिनविरोध निवडणूक होणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आता त्यांनी मोठं मन दाखवावं ही निवडणूक बिनविरोध केली तर महाराष्ट्रात संस्कृती आहे असं लोकांना वाटेल असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT