अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. माननीय उच्च न्यायालयाने यासंदर्भातले आदेश दिले आहेत. आता नैतिक जबाबदारी स्वीकारून अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. समजा अनिल देशमुख राजीनामा देत नसतील तर तो राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना गृहमंत्रीपदावरून हटवावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. घाटकोपरमधे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
मोठी बातमी ! परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची CBI चौकशी होणार
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंकडे १०० कोटींची वसुली करण्यात यावी असे सांगितले होते असा दावा करण्यात आला होता. या पत्रानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ माजला होता. यानंतर परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर सिंग यांच्या याचिकेवरचा निकाल राखून ठेवला होता. या याचिकेवर आज सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या प्रकरणात CBI चौकशीचे आदेश दिले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे १५ दिवसांमध्ये सीबीआयला आपल्या चौकशीचा अहवाल न्यायालयाला सादर करायचा आहे.
सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?
मुख्यमंत्र्यांची भूमिका चकित करणारी
अनिल देशमुख हे या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्यावर झालेले आरोप अत्यंत गंंभीर आहेत तरीही या सगळ्या आरोपांच्यानंतर मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत ही त्यांची भूमिका चकित करणारी आहे. अधिवेशन संपल्यानंतर सचिन वाझे यांच्याबाबत जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सचिन वाझे काही ओसामा बिन लादेन नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी देऊन सचिन वाझेंची पाठराखण केली होतीच. त्यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दलही काहीही भूमिका घेतली नाही. अधिवेशनानंतर कितीतरी घडामोडी घडल्या.. रश्मी शुक्ला यांनी केलेले आरोप असतील. परमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र असेल या कशावरही मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. त्यांचं हे मौन त्यांच्या घराण्याला साजेसं नाही. याबद्दल त्यांनी भाष्य केलं नाही तर त्यांच्यावरही लोकांचा विश्वास उरणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT