राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील राहत्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी केली. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे अनिल देशमुखांवर १०० कोटींची खंडणी मागितल्याचे आरोप केले होते. याच प्रकरणात ईडीने आज सकाळपासून देशमुखांच्या घराची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार आहे असं म्हटलंय.
ADVERTISEMENT
अनिल देशमुखांनी घोटाळ्याचा पैसा हा कोलकात्यामधील बोगस कंपन्यांद्वारे आपल्या परिवाराच्या नावावर असलेल्या लोकांकडे वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याच प्रकरणात छगन भुजबळ ३ वर्ष जेलमध्ये होते, आता अनिल देशमुख आणि अनिल परबांची अवस्थाही अशीच होणार असल्याचं कळतंय.
सकाळी ८ वाजल्यापासून ईडीचं ६-७ जणांचं पथक देशमुखांच्या घरी चौकशी करत आहे. या कारवाईदरम्यान अनिल देशमुख घरी नसल्याचं कळतंय. परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंकडे १०० कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने काही दिवसांपूर्वी कोलकात्यामधील १२ कंपन्यांवर छापेमारी केली होती. या कारवाईत या बाराही कंपन्या बोगस असल्याचं समोर आलं. तपासादरम्यान १३० कोटींच्या व्यवहाराचे काही धागेदोरे हे देशमुख यांच्याशी जोडले गेल्यामुळेच त्यांच्या घरावर आज छापेमारी करण्यात आल्यची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT