गडचिरोली: आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर आक्रमक असलेल्या मराठा समाजाने काही दिवसांपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. या मुद्द्यावर नक्षलवाद्यांनी (Naxals) उडी घेत आरक्षण हा खुळखुळा असून त्यात शक्ती खर्च घालू नका, असा सल्ला देत मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहण्याचा इशारा पत्राद्वारे नक्षलवाद्यांनी दिला होता. या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली होती.
ADVERTISEMENT
या पत्राला संभाजी शाहू छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी उत्तर दिले होते. तेव्हा पुन्हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) च्या महाराष्ट्र राज्य कमिटीचा सचिव सह्याद्री याच्या सहीने 29 जून रोजी दुसरे पत्रक जारी करण्यात आले.
संभाजी शाहू छत्रपती यांनी आमच्या पत्राची दखल घेत प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानत विविध मुद्द्यावर पत्रात उल्लेख आहे.
नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला लिहिलेले दुसरे पत्र अगदी जसेच्या तसे-
प्रति, माननीय संभाजी शाहू छत्रपती,
आपले पत्र आम्हाला मिळाले. आम्ही दिलेल्या हाकेला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार, पत्राची दखल घेतली, त्यावर विचार केला व आपले मत सुध्दा मांडले हे स्वागत योग्य आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा व इतरही प्रश्न सोडविण्याचे जे विचार व्यक्त केले ते अत्यंत चांगले व अभिनंदनीय आहे. व याकरिता आमची नेहमी सक्रिय साथ राहील.
आपल्या आंदोलनाच्या फॉर्मला विरोध नाही. जिथे जनता आंदोलित आहे तिथे आम्ही आहोतच. चालू द्या समर्थन आहे. पण ते पर्याप्त नाही. प्रश्नाचे मूळ कृषी संकट व एकंदर चालत असलेल्या आर्थिक धोरणात आहे. ते आरक्षणाने पूर्णपणे सुटणार नाहीत असे आमचे अभ्यासाअंती ठाम मत झाले आहे. आपण राजर्षी शाहू महाराजांचे वारस आहात, त्यांचा विचारांचा वारसा घेऊन चालत आहात ही आनंदाची गोष्ट आहे. विचार व कृती एकरूप झाल्यास यश निश्चितच पदरात पडते.
आम्ही शिवबाचे सच्चे पाईक आहोत म्हणूनच तर शस्त्र उचलून, शिर तळहाती घेऊन लढत आहो. आमच्या रक्ताची लाली कोल्हापुरात कशी काय पोहोचली नाही. राजेसाहेबांना ‘आम्ही कोण म्हणून प्रश्न विचारावा लागत आहे. सह्याद्रीच्या कपाऱ्यातून उगवणाऱ्या सूर्याकडे बघाल तर तुम्हाला आमचा आभास होईल.
आम्ही रक्ताचे शिंपण आंदोलनाच्या भूमिवर करून त्या सिंचनाच्या बळावर क्रांतिकारी आंदोलनाचा मळा फुलवीत आहो. आम्हाला कुणाची मतं मिळवायची नाही. आम्ही सत्य काय ते सांगतो. कुणी भुरळ घालावे व ते मोहीत व्हावे इतके भोळे मराठा समाजातील आंदोलन करणारे तरूण आणि तरूणी नाहीत.
ते शिक्षित आहेत स्वतंत्र निर्णय करण्याची चांगली क्षमता त्यांच्यात आहे. जिथपर्यंत जवळून आम्ही पाहात आहो किंवा संपर्काच्या माध्यमातून जाणून घेत आहोत त्यातून स्पष्टपणे हे चित्र समोर येत आहे की, शोषित मराठा समाजाला आता उच्चभ्रू मराठा भांडवलदार व त्यामागचे नेते सामाजिक बंधनाच्या भावनेत जास्त दिवस गोवून ठेवू शकत नाही. प्रेशर वाढले आहे कुकरचा केव्हाही विस्फोट होवू शकतो.
पर्सनली घेऊ नका, पण सांगावेसे वाटते कि रक्ताचं नातं आपलंही आहे. तुम्ही, आम्ही, शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्री बाई फुले. डॉ. आंबेडकर, गांधी, गॅलिलिओ, न्यूटन, आईन्टाईन्स, स्टिफन हॉकिंग्ज आपण सगळे एकाच वंशाचे आहोत. आणि आपला वंश काकेशियन’ आहे.
‘निग्रायड’ व ‘मंगोलायड’ हे आपले बंधू आहेत व या तिघांमध्ये कोणी मोठे व लहान नाही, श्रेष्ठ व कनिष्ठ नाही. प्रत्येक नवा माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा पूर्वीच्या दोन पिढ्यांकडून अर्ध-अर्ध रक्त घेत असतो. हे दोन रक्त मिळूनच नवीन जीव तयार होतो.
आपल्या पितृसत्तात्मक समाजामध्ये ही मोठी विडंबना आहे कि जन्म देणारी, अर्ध रक्त देणारी व नवीन जीवाला पूर्ण विकसित करणाऱ्या आईला तिच्या कुळाला सम्मान नाही. तिचे नावही नाही.
उद्देश चांगला असला तरी त्याची सफल होण्याची आणि त्याच्या अमंलबजावणीची शक्यता समाजगतीच्या विज्ञानाच्या व तर्काच्या कसोटीवर तपासून पाहिली पाहिजे. आता जगाने लोकशाही स्वीकारली आहे पण त्या आधी सरंजामशाही होती व त्याच्याही आधी गुलामी व्यवस्था होती.
मानवी समाज सतत विकास करीत आला आहे. प्रत्येक विकासात अन्यायग्रस्त व दबलेल्या लोकांनीच समाजव्यवस्थेत स्थित्यंतर घडवून आणले आहे.
प्रत्येक व्यवस्था तिच्या निर्माणीच्या वेळी चांगलीच असते. प्रत्येक गोष्ट जिचा उगम आहे तिचा विकास आहे व नंतर तिचा लोप होत असतो. हा प्राकृतिक नियम आहे व तो मानवी समाजालाही लागू पडतो.
यात दुमत नाही कि लोकशाही व्यवस्थेने सरंजामशाहीचे बंधने तोडले पण याच लोकशाहीने अर्थात भांडवलशाहीने शोषण, दमन व प्रकृती विनाशाचे उग्र रूप धारण केले. प्रकृतीच्याच जीवावर उठली आहे.
भारतात तर सरंजामशाहा संपूर्णपणे संपुष्टात न आणता आहे. ती आता मानव, जीव, जंतू, पशू, पक्षी, एकंदर लोकशाही नावाने राज्य स्थापन केले.
खरे तर ही भांडवली मनोवैज्ञानिक जातिय पूर्वग्रहीत मानसिकतेतून केवळ 9 बिलियनर्स देशातील 50 टक्के जनतेच्या एवढी संपत्ती त्यांच्याजवळ साठवून ठेवतात. या बिलियनर्स व त्यांचे सेवक म्हणून काम करणारे नेते व मोठे अधिकारी यांची तानाशाही भारतीय जनतेवर चालू आहे जिला शाही असे नाव आहे.
‘नाव सोनाबाई आणि हाती कथलाचा वाडा’ अशी स्थिती भारतीय तथाकथित लोकशाहीची आहे. याच लोकशाहीने मराठा समाजाची ही अधोगती केली आहे. हे काही व्यक्तीमुळे नाही संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी ठरली आहे. म्हणून दुःखाने असे म्हणावे लागत आहे की सम्मान असताना देखील आम्ही ते मान्य करू शकत नाही.
कारण ज्याला मुख्य मार्ग म्हटले जाते तो वास्तविक भ्रम आहे. परिवर्तनाच्या गतीसोबत जुळून असतो व तोच आम्ही स्विकारला आहे. तो आवेशातुन नाही तर समाज विज्ञानाच्या गतिच्या काढून तयार केलेला आहे. आम्ही याच विज्ञानाच्या व पुराव्याच्या आधारे ठोकपणे सांगू इच्छितो कि आमचा मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग आहे.
प्रश्न व्यक्तिचा नाही, नसतोच, मनुष्य उत्पादन करायला लागला तेव्हापासूनच सामाजिक झाला आहे. प्रश्न नेहमी संस्थांचाच असतो. डॉ. आंबेडकरांनी लोकशाहीची संकल्पना अशी मांडली होती, एक व्यक्ती आणि एक वोट एक भागीदारी करण्यासाठी सशक्तीकरण, लोकशाहीचा अर्थ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव.
त्यांनी संसदीय लोकशाहीबद्दल म्हटले होते लोकांव्दारे ते म्हणतात कोणत्याही व्यक्तीची (स्त्री किंवा पुरूष) त्याच्याशी संबधित असलेल्या निर्णय प्रक्रियेत आपल्या स्वामीच्या बाजूने मतदान करणे आणि त्यांच्या स्वतःवर राज्य करण्याकरिता त्यांना अधिकार देणे. गेल्या 70 वर्षात या तत्वांची सतत पायमल्ली होत आली आहे.
आता या लोकशाहीचा जीर्णोध्दार करून नवलोकशाही स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. व हे कार्य क्रांतीशिवाय संपन्न होणार नाही. आठवण म्हणून सांगतो कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना पास झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षातच म्हटले होते कि ‘ही राज्यव्यवस्था देशात राजकिय, सामाजिक व आर्थिक समानता आणू शकली नाही तर हिला जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अपेक्षे प्रमाणे या राज्यघटनेने सामाजिक व आर्थिक समानता आणली नाही तर हिला जाळणारा पहिला व्यक्ती मीच राहणार.”
भारताच्या सीमेला कसलाही धोका नाही. भारत व शेजारी दोघेही परमाणू शस्त्र संपन्न आहोत. कोणी एकानेही चूक केली तर ती त्याच्या स्वतःच्या जिवावर उलटू शकते हे सर्वच जाणतात. देशाला खरा धोका देशाला पोखरून टाकत असलेल्या साम्राज्यवादी दलालांचा आहे. व ते देशात सत्तेत, कार्पोरेट कंपन्यांच्या बोर्डात बसले आहे.
‘आम्ही तुमच्या सोबत, तुमची वाट पाहत आहोत’, मराठा आरक्षणाबाबत नक्षलवादी संघटनेकडून पत्रक जारी
शोषित मराठा युवकांचा लढा एकप्रकारे या व्यवस्थेचं पितळच उघडं पाडत आहे. त्या दृष्टीने हा लढा देशात नव्या लोकशाहीकरिता चालू असलेल्या व्यापक जनतेच्या लढ्याचा एक भाग ठरतो.
नेतृत्व कोण, संघटनेचे नाव काय हा तात्काळचा प्रश्न आहे. शेवटी सर्वांना नव्या लोकशाहीकडेच वाटचाल करावी लागणार आहे. जनयुध्द सुरू आहे. काही योध्दे शस्त्र घेऊन तर काही झेंडे बॅनर घेऊन मैदानात आहेत. अर्ध्यावर डाव सोडणारे आम्ही नाही, आणि शिवबांच्या तलवारीला गंज लागणार नाही याची काळजी तुम्हीही घ्याल अशी आमची अपेक्षा आहे….
धन्यवाद.
सहयाद्री
सचिव, भाकपा (माओवादी), महाराष्ट्र राज्य कमेटी
ADVERTISEMENT