महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशात ठाकरे सरकारमधले मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि प्राजक्त तनपुरे यांच्या पाठोपाठ आता यशोमती ठाकूर यांनाही कोरोना झाला आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोना झाला आहे. विरोधी पक्षातील म्हणजेच भाजपमधील राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोना झाला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे यशोमती ठाकूर यांनी ट्विटमध्ये?
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी. असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आहे. यामध्ये वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे इतर नेतेही होतेच. राज्यात रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच आता ठाकरे सरकारमधील एक एक मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. रूग्ण दुपटीचा वेग लक्षात घेता राज्यात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ शकते असंही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
गर्दी नको, बेफिकीरीतून वाढलेला कोरोना संसर्गही नको! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनातही हजर होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला लग्नाला उपस्थिती लावली होती. राधाकृष्ण विखे पाटील हे त्या लग्नात विनामास्क दिसले होते. या लग्न सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थिती होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?
मुंबईसह राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही केले. ते म्हणाले, ‘सुप्रियाच्या तर सगळ्या घराला कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही अनेक लोक मास्क न घालता फिरतायत. बाबांनो माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मी सभागृहात आल्यापासून ते घरी जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलतानाही काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहेत. आपणच नियम पाळणार नाही तर नियम सांगण्याचा अधिकार मला नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत बाहेर न करता, घरातच करा.’
ADVERTISEMENT