क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. ब्रिटनच्या राजघराण्याने ही बातमी दिली आहे. या घटनेनंतर ब्रिटनवर शोककळा पसरली आहे. स्कॉटलँडमध्ये एलिझाबेथ यांचं निधन झालं. आता त्यांचे पुत्र चार्ल्स हे किंग म्हणून पदभार स्वीकारतील. ब्रिटनमध्ये दहा दिवसांचा दुखवटा जाहीर कऱण्यात आला आहे. तसंच महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यंस्काराचीही तयारी सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
Queen Elizabeth : सात दशकांचा गौरवशाली प्रवास इतिहासजमा, कशी होती क्वीन एलिझाबेथ यांची कारकीर्द?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची क्वीन एलिझाबेथ यांच्याविषयीची पोस्ट
अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो तो कमालीचा एकटेपणा घेऊन य़ेतो असं म्हणत राज ठाकरे यांनी क्वीन एलिझाबेथ यांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.
काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट?
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्षे त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. ही ७० वर्षे कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्षे. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांतींनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे.
ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खासगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.
कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ २ ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ २ ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ २ ह्यांच्या स्मृतीस अभिवादन.
– राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव हे स्कॉटलँडहून शाही ट्रेनने बकिंगहॅम पॅलेस या ठिकाणी आणलं जाणार आहे. तसंच पुढचे दहा दिवस ते ठेवलं जाईल. दहाव्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गुरूवारी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री ११ च्या सुमारास त्यांच्या निधनाची बातमी आली. महाराणी एलिझाबेथ यांचा मृत्यू ब्रिटनच्या प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजता झाला असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी महाराणींबाबत लिहिलेली पोस्टही चर्चेत आहे.
ADVERTISEMENT