आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोलणार नाही, असं म्हणणाऱ्या शिंदे गटाने युवा सेना प्रमुखांना लक्ष्य केलं. आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे पप्पू उल्लेख करत शिंदे गटाने मातोश्रीवरही हल्ला चढवला. शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीला शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांच्याबद्दलचे बॅनर आज (२५ ऑगस्ट) शिंदे गटाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर झळकावले आणि मातोश्रीवर खोके घेतल्याचा आरोपही केला. या प्रकारावर अरविंद सावंत यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून उत्तर दिलंय.
अरविंद सावंत म्हणाले, “याचा अर्थ आदित्य ठाकरे यांच्या व्हिजनरी नेतृत्वाला ते (शिंदे गट) घाबरत आहेत. त्यांना कळून चुकलंय की, हे महाराष्ट्राचं उद्याचं नेतृत्व आहे. देशाचंही नेतृत्वही कदाचित ते होईल. मग त्यांना बदनाम कसं करायचं, हा केविलवाणा प्रयत्न आहे. एक अतिशय व्हिजनरी तरुण मुलगा, एका वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं आणि मुंबईचं नेतृत्व करत होता. दावोसमध्ये त्यांची मुलाखत घेण्यासाठी जगभरातील माध्यमे धावली. त्यांना या गल्लीतल्या लोकांनी काहीतरी बोलणं आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा बिघडणार नाहीये. जे कुणी करताहेत, त्यांची प्रतिमा नक्कीच कळेल की, कोण भूंकतंय कुणावर? याने काहीही फरक पडणार नाहीये, उलट ते (आदित्य ठाकरे) अधिक उजाळून निघतील”, असं प्रत्युत्तर अरविंद सावंतांनी शिंदे गटातील आमदारांना दिलं.
‘अधिकाऱ्याला म्हणालो, मंत्रीपद गेलं तरी मला फरक पडत नाही’; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा
५० खोकेवरून शिंदे गट आक्रमक झालाय. सहन करणार नाही, असा इशारा शिंदे गटाकडून दिला गेलाय. त्यावर अरविंद सावंत म्हणाले, “अब्रू गेली ना. त्यांची अब्रू केव्हाचं गेलीये. जनमाणसात सगळ्यांच्या लक्षात आलंय. अनेक व्हिडीओ क्लिप्स फिरताहेत. ज्याच्यामध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलंय की, आम्हाला इतके पैसे दिले गेलेत. अशी त्यांच्या समर्थकांची आणि त्यांची भाषणंही आहेत. अब्रू गेलीये त्यांची, ती पायऱ्यांवरून आणखी खाली जाणार. सभागृह सोडून पायऱ्यांवर आले, त्यांच्यासाठी ती उतरंड ठरणा आहे आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं”, असं अरविंद सावंत म्हणाले.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की, शिंदे गटावर सावंत यांचा हल्ला
विधानभवनावरील पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीबद्दल अरविंद सावंत म्हणाले, “कुणाबद्दल बोलताहेत तुम्ही, हे सरकारच बेकायदेशीर आहे. महामहीम राज्यपालांपासून जी काही पावलं टाकली गेलीत, ती सर्व बेकायदेशीर आहेत. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा कळतंय की हे सर्व बेकायदेशीर आहे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण भाजप या देशात रुजवते आहे. ते स्वतःची कबर खोदत आहेत.”
“काल जो प्रकार घडला आहे. तो महाराष्ट्रासाठी भूषणावह नाहीये. हे ठरवून केलं. रोज आम्ही करतोय म्हणून लवकर जाऊन जागा आडवायची. जे जे प्रकार ते आता करताहेत ते लोकांना कळताहेत. मराठी माणसाचं खच्चीकरण, महाराष्ट्राचं खच्चीकरण करणारी केंद्राची धोरणं जशीच्या तशी राबवली जाताहेत”, अशी टीका सावंत यांनी केली.
“नितीन गडकरींचे बरोबर पाय कापले, मराठी माणसाचं खच्चीकरण”
पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “मुंबई आणि महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला पळवले. हे जे अलिबाबाचे ४० मित्र गेले होते, त्यांना विचारा. त्यांना विचारा की, जनाची नाही, तर मनाची आहे का? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाहीये. आतंरराष्ट्रीय उद्योग केंद्र गुजरातला नेलं गेलं. नितीन गडकरींचं काय खच्चीकरण केलंय. एक मराठी माणूस कुठेतरी वर येत होता. बरोबर पाय कापले.”
देवेंद्र फडणवीसांबद्दल अरविंद सावंत म्हणाले…
“फडणवीसांनी सांगितलं होतं की, सरकारमध्ये सामील होणार नाही. वरून आदेश आला, चला शपथ घ्या. घेतली शपथ. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं. सगळी खाती घेऊन कारभार होणार नाही. ज्यांच्या सरकारला नैतिकता नाही, नीतिमत्ता नाही. जे स्वतः सगळे यात बुडालेले आहेत. भ्रष्टाचारावर बोलण्याचा यांना नैतिक अधिकारच नाही. भाजपची गटारगंगा झालीये”, अशा शब्दात अरविंद सावंतांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT