महाराष्ट्रासह देशभर गाजलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबीच्या एसआयटी समितीकडून केला जात असून, एनसीबीने पुन्हा एकदा न्यायालयाकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. एनसीबीने वेळ मागत असताना न्यायालयासमोर कारणांची मोठी यादीच ठेवली आहे.
ADVERTISEMENT
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी जप्त केलेल्या पदार्थांचे १७ नमुने पुण्यातील राष्ट्रीय न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे (Central Forensic Science Laboratory) तपासणीसाठी पाठवले होते. हे सर्व घटक एनडीपीएस कायद्याच्या कक्षेत येणारी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ असल्याचं सीएफएसएलने म्हटलेलं आहे. आतापर्यंत ६९ जबाब नोंदवण्यात आले असून, १० स्वतंत्र साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. अजून ४ साक्षीदारांची चौकशी बाकी आहे. आतापर्यंत १९ संशयितांची साक्ष नोंदवण्यात आली असल्याची माहिती एनसीबीच्या एसआयटीने न्यायालयात दिली आहे.
आर्यन खान प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीच्या एसआयटीने न्यायालयात काही कारणं सांगितली आहेत, ती अशी…
आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या के.पी. गोसावींवर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तो चर्चेत आला होता. याच के.पी. गोसावीसंदर्भात एनसीबीने न्यायालयात माहिती दिली आहे. “गोसावीचा ऐच्छिक जबाब आणि रेकॉर्डिंग पूर्ण झालेलं नाही. त्याला इतर प्रकरणात पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावलेली आहे. यासंदर्भात न्यायालयाकडे तीन वेळा विनंती केली, मात्र न्यायालयाने विनंती मान्य केलेली नाही. गोसावीचा जबाब नोंदवण्याच्या प्रतिक्षेत आहोत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह काही आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा करताना गोसावी हा मुख्य पंच साक्षीदार आहे, असं एसआयटीचं म्हणणं आहे.
या प्रकरणातील आणखी एक पंच म्हणजे प्रभाकर साईल. प्रभाकर साईलने आता पलटी मारली असून, त्याने कथित प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केलेला आहे. हे प्रकरण अद्याप न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य आणि अचूक वस्तुस्थिती तपासण्यासाठी केपी गोसावी याची चौकशी आवश्यक आणि निर्णायक ठरते, असं एनसीबीच्या एसआयटीने म्हटलेलं आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले २० आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. हे आरोपी महाराष्ट्र, ओडिशा, गोवा, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली यासारख्या देशातील विविध भागातील रहिवाशी आहेत. एनसीबी एसआयटी अजूनही त्यांचे जबाब नोंदवत आहे. ते देशाच्या विविध भागात राहत असल्याने आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या फिरण्यावर निर्बंध आलेले असल्यानं ही जबाब नोंदणीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यातही अनेक आरोप जबाबासाठी वेळेवर हजर झाले नाहीत, त्यामुळेही विलंब झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक आरोपी कोविड पॉझिटिव्ह होते आणि उपचार आणि क्वारंटाईनमध्ये होते. त्यामुळे त्यांची भूमिका आणि पुरावे तपासण्यासाठी त्यांची चौकशी सुरू आहे, असंही एसआयटीने म्हटलं आहे.
या प्रकरणात डिजिटल डेटा (डिजिटल स्वरुपातील माहिती) आणि पुरावे यांचं प्रमाण जास्त आहे. आरोपी आणि संशयित यांच्यातील सोशल मीडियातून झालेली संभाषणे हजारो पानांची असून, प्रत्येक संभाषणामध्ये व्हाईस नोट (ऑडिओ स्वरूपातील मेसेज) आहेत, ज्याची व्यवस्थित तपासणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लिखित स्वरूपात तयार करणंही गरजेचं आहे. सीडीआरची तपासणीही गरजेची असून, त्यातून आरोपी आणि संशयितांचे संबंध अंतिम तक्रारीत दिसू शकतात, असंही एसआयटीने न्यायालयाला सांगितलं.
एनसीबीकडून आर्यन खानवर लावण्यात आलेल्या आरोपांचा एसआयटीने पुर्नउल्लेख केला आहे. काही आरोपी हे अत्यंत प्रभावाशाली आहेत. त्यांनी भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीशीही संभाषण केलेलं आहे. परदेशी नागरिकांचाही यात सहभाग असल्याने अशा चॅट्सचे (मेसेजवरून करण्यात आलेला संवाद) परीक्षण आणि विश्लेषण करण्याचं काम सुरू आहे. नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत देशात कोविड परिस्थिती गंभीर असल्यानं परदेशातील यंत्रणांकडूनही माहिती देण्यास विलंब झाल्याचं, एसआयटीचं म्हणणं आहे.
काही आरोपींनी एनसीबीने जप्त केलेल्या मोबाईल/लॅपटॉप/टॅब्लेट आदींना चुकीचे पासवर्ड दिलेले आहेत. ते काढण्यात अडचणी येत असून, त्यामुळे त्याच्या फॉरेन्सिक तपासणीलाही विलंब होत आहे, असं एसआयटीने न्यायालयाला सांगितलं आहे.
या प्रकरणाशी संबंधित दोन नायजेरियन नागिरकांचा संपर्क आणि त्यांचे ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती एसआयटीने न्यायालयाला दिली आहे.
या प्रकरणातील बहुतेक आरोपी एसआयटी समोर त्यांच्या अधिकाराचा वापर करून मौन बाळगून आहेत वा सहकार्य करत नाहीयेत. ज्यामुळे तपासाच्या गतीवर परिणाम होऊन विलंब होत आहे. प्रकरणाचा तपास पुढे घेऊन जाण्यासाठी एसआयटीला डिजिटल डेटाचे विश्लेषण करावं लागेल आणि ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, असं एसआयटीचं म्हणणं आहे.
सीडीआरएस, सीएएफने प्रामाणित केलेल्या हार्ड कॉपी अजूनही दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्याकडून मिळालेल्या नाहीत. आरोपी आणि संशयित यांच्यातील संबंध सिद्ध करण्यासाठी त्यांची तपासणी केली जात आहे. अंतिम तक्रार दाखल करण्यापूर्वी याची सत्यता पडताळून घेणं आवश्यक आहे, असं एनसीबीच्या एसआयटीने म्हटलेलं आहे.
मनी ट्रेल आणि अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी दिलेले पैसे यांचाही आर्थिक व्यवहारांच्या अंगाने तपास सुरू आहे. परदेशी नागरिकांपर्यंत ड्रग्जचा माग काढण्याचे कामही सुरू असून, आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार या साखळीतील काही टोकाच्या घटकांचाही तपास सुरू आहे, असंही एनसीबीच्या एसआयटीने म्हटलेलं आहे.
एनसीबीच्या एसआयटीने आतापर्यंत केलेल्या तपासातून असं आढळून आलं आहे की, निष्पक्ष आणि तार्किक निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांची नावं समोर आलेली आहेत, अशा आणखी संशयितांची चौकशी करणं गरजेचं आहे. त्यामुळेच एसआयटीकडून आरोपपत्र दाखल करण्यास मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
आतापर्यंत १५ प्रमुख संशयितांचे जबाब नोंदवायचे असून, आरोपी मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सतीजा, अब्दुल कादर शेख, चिनेदू इग्वे आणि ओकोरो उझोमा यांच्याविरोधातील तपास पूर्ण केला आहे, असं एनसीबीच्या एसआयटीने न्यायालयाला सांगितलं आहे.
ADVERTISEMENT